बीड, दि.11 (लोकाशा न्युज)ः जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाले असल्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यातील 144 प्रकल्पापैंकी 45 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत तर 17 प्रकल्पात 75 टक्क्यांपेक्षा पाणीसाठा उपलब्ध झाला असून आठ प्रकल्प अद्यापही कोरेडेठाक असून या प्रकल्पांना पावसाची प्रतिक्षा आहे.
जिल्ह्यात माजगलाव व मांजरा हे दोन प्रकल्प मोठे असून 16 प्रकल्प मध्यम तर 126 प्रकल्प मध्यम स्वरुपाचे आहेत. जिल्ह्यात मोठे, मध्यम, लघु असे मिळून असे एकुण 144 प्रकल्प असून त्यापैकी मध्यम 6 व लघु 39 असे एकुण 45 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. 17 प्रकल्पांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. तर 11 प्रकल्पांमध्ये 50 ते 75 दरम्यान पाणी आहे. मांजरा, मध्यम 2, लघु 29 अशा एकुण 32 प्रकल्पाचे पाणी जोत्याखाली असुन 8 लघु प्रकल्प अद्यापही कोरडेठाकच आहेत. दरम्यान यंदा 638.9 मी.मी.एवढा सरासरी पाऊस झाला असून मागील आठवड्यात 495.20 मी.मी.एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
हे धरण भरले 100 टक्के
बिंदूसरा, सिंदफणा, महासांगवी, मेहेकरी, कुंडलिका, वाघे बाभुळगाव असे मध्यम स्वरुपाचे सहा प्रकल्प तर वंजारवाडी, कनवट, मौज, ईट, बेलुरा, शिवणी, डोकेवाडी, जुजगव्हाण, मनकर्निका, लोकरवाडी, कचरकुंडी, खोकरमोहा, वारणी, उथळा, मोरझलवाडी, पिंपळवंडी खोपटी, नारायणगड, नागतळवाडी, धनगरजवळका, भायाळा, दासखेड, इंचरणा, लांबरवाडी, सौताडा, भुरेवाडी, वसंतवाडी, धामणगाव, घागरवाडा, जाधवजवळा, देठेवाडी, लिंबाचीवाडी 1, लिंबाचीवाडी 2, भोगलवाडी, धारुर, खानापुर, चिखलबीड, तिगाव, चारदरी, काळवडी, करेवाडी असे एकुण 39 लघु स्वरुपाचे प्रकल्प 100 टक्के भरले आहे
32 प्रकल्प जोत्याखाली
जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पासह मध्यम स्वरुपाचे दोन व लघु स्वरुपाचे 29 प्रकल्प असे एकुण 32 प्रकल्पातील पाणी अद्यापही जोत्याखालीच आहे. सदरील प्रकल्पांना अद्यापही पाण्याची प्रतिक्षा असून पुढील एक महिन्यात प्रकल्पातील पाणी पातळी वाढेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.