नागपूर, दि. १० (लोकाशा न्यूज) : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाल्याचे बनावट प्रमाणपत्र मिळवून त्याद्वारे शासकीय नोकऱ्या लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नागपुरात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. संजय सावंत, पवन पाटील आणि निखिल माळी असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस खेळाडूंची नावे आहेत. राज्यात शेकडो बोगस खेळाडूंनी नोकऱ्या लाटल्याची माहिती समोर आली आहे. क्रीडा संचालनालय एकट्या नागपूर विभागात 21 प्रकरणाचा तपास करत आहे. 3 ते 5 लाखात बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे पवन पाटील आणि निखिल माळी यांनी ट्रेम्पोलिन या जिम्नॅस्टिक प्रकाराच्या खेळाचे प्रमाणपत्र मिळवत त्याआधारे नोकरी मिळविली होती. त्यांच्या प्रमाणपत्रामध्ये मुंबईत राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्याचे नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात अशी कुठलीही राष्ट्रीय स्पर्धा मुंबईत झालीच नसल्याचे तपासात समोर आले आहे. तर संजय सावंत यानं पॉवर लिफ्टिंगचे बनावट प्रमाणपत्र बनवले होते आणि पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळविले होते. मात्र, ते प्रमाणपत्र ही खोटे निघाले आहे.