Site icon लोकाशा-बंब न्यूज

धुळ्यात राहुल गांधी नावाने वीज बिल, महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; प्रत व्हायरल


धुळे दि.04(लोकाशा न्यूज): गांधी राहुल राजीव… या नावाचं वीज बिल धुळे शहरातील माणिकनगर भागातील आहे. बिलावरील नाव वाचून धक्का बसला ना? सोशल मीडियावर या बिलाची प्रत व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीच्या संकेत स्थळावर देखील गांधी राहुल राजीव हे ग्राहकाचे नाव दर्शवण्यात येत आहे.
बिलावरील नाव खरे आहे. धुळ्यातील या नावाच्या व्यक्तीचं काही वर्षांपूर्वीच निधन झाल्याचं सध्या या घरात राहणारे शाहजराम यादव सांगतात. हे घर शाहजराम यादव यांनी साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी विकत घेतल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र शाहजराम यांनी बिलावरील नावात बदल केला नाही.
लाईट बिलावर नाव म्हणजे प्रॉपर्टी कार्ड नसल्याचं यापूर्वीच वीज वितरण कंपनीने देखील जाहीर केलं आहे. त्या प्रॉपर्टीमध्ये कोण राहतं? कोणाच्या नावावर ती प्रॉपर्टी आहे याला महत्त्व नाही. त्या प्रॉपर्टीच्या भोगवटादाराने तो कर, लाईट बिल भरणे क्रमप्राप्त ठरते. त्या प्रॉपर्टीचा कर, लाईट बिल जोपर्यंत नियमित भरला जातो तोपर्यंत वारसाचा वाद येत नाही, मात्र जर का कर, लाईट बिल थकल्यानंतर जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा मात्र वाद उफाळून येतात, हा त्यातील एक प्रकार असल्याची चर्चा आहे.
नावातील साधर्म्यमुळे धुळ्यातील गांधी परिवार चर्चेत आला. ज्या माणिकनगरमध्ये राहुल गांधी राहत असल्याचा वीज बिलावर पत्ता आहे त्याठिकाणी एबीपी माझा पोहोचला. तेव्हा असं लक्षात आलं की त्या माणिकनगरातील नागरिकांना देखील माहित नव्हतं की आपल्या भागात राहुल गांधी नावाची व्यक्ती राहते.
राहुल गांधी यांच्या या व्हायरल वीज बिलावर बिलिंग युनिट देवपूरचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात माणिकनगर हा भाग देवपूर बिलिंग युनिटमध्ये येत नाही. म्हणजे याठिकाणी वीज वितरण कंपनीतर्फे बिलिंग युनिट चुकीने प्रिंट झालं आहे की यात जाणूनबुजून झालेल्या चुकीकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होतंय अशी देखील चर्चा धुळे शहरात सुरु आहे. वीज बिलावरील नाव बदलण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करुन देखील उपयोग होत नव्हता. अखेरीस समाज माध्यमांमध्ये हा विषय येताच बिलावरील नाव बदलण्याचा विषय मार्गी लागल्याच शाहजराम यादव सांगतात.

Exit mobile version