नवी दिल्ली: कोरोनाच्या कठिण काळात शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ’मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज, 30 ऑगस्ट रोजी देखील ते ’मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 7% वाढ झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात प्रत्येक सणाला संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन
साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे, असं पंतप्रधान म्हणाले.