परळी : परळी शहरातील अत्यंत गजबजलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील अरुण अँड सन्स ह्या सोने-चांदीच्या दुकानी तोंडाला स्टोन बांधून अज्ञात महिलांनी जवळपास दोन लाखांचे सोने लंपास केले. विशेष म्हणजे श्रीगणेश आणि महालक्ष्मीच्या पार्श्वभूमीवर सदर चौकात पोलिस बंदोबस्त तैनात होता. ही घटना दिवसा ढवळ्या घडल्याने सोने-चांदी व्यापार्यांत घबराट निर्माण झाली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री गणेश स्थापना आणि महालक्ष्मी ह्या सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दीचा गैरफायदा घेत सोने चांदीच्या दुकानी गेली आणि दिवसांपासून काही अज्ञात महिला डल्ला मारण्याचा इराद्याने बाजारात फिरत असल्याची बातमी शहरांमध्ये फिरत होती. मात्र फिरत असलेली बातमी आज सत्यत्तेच्या स्वरूपात समोर आली. परळी शहराची हार्ट ऑफ सिटी म्हणून नावलौकीक असलेले राणी लक्ष्मीबाई टावर परिसरात अरुण टाक यांचे गेली अनेक वर्षांपासूनचे जुने अरुण टाक अँड सन्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे. सदर दुकानी भरदिवसा म्हणजे अंदाजे बारा ते साडेबारा दरम्यान काही अज्ञात महिला तोंडास स्टोन बांधून ह्या दुकानी सोने खरेदीच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील नौकरांना गंठण दाखवण्याची मागणी केली. बागडी केल्यानुसार नोकरांनी सोन्याचे विविध प्रकारचे गंठनही दाखवले. मात्र अरुण टाक यांचे नोकरवर्ग सदर महिलांना विविध प्रकारचे गंठण दाखविण्यात व्यस्त असतानाच त्याचा गैरफायदा घेत नोकरांच्या डोळ्यात धूळ फेकल्यागत तोंडावर स्टोन बांधलेल्या त्या महिलांनी एकूण चार तोळे वजन असलेले दोन गंठण ज्यांची अंदाजे किंमत दोन लाख रुपयाची आहे दिवसा ढवळ्या लांबवले. राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात सोन्या-चांदीची अनेक दुकाने आहेत त्यामुळे ह्या भागास सोनार लाईन देखील म्हंटले जाते. क्षणात ही वार्ता वार्यासारखी सोन्या-चांदीच्या व्यापार्यांत पसरली आणि एकच खळबळ उडाली सध्या परिस्थितीत जो तो व्यापारी असुरक्षित समजत आहे. दरम्यान या घटनेबद्दल अरुण टाक अँड संन्सचे मालक अरूण टाक यांनी शहर पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. बातमी लिहीपर्यंत अद्याप शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच सणासुदीचे दिवस असल्याकारणाने सदर भागात आणि बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा आणि त्यामध्ये महिला पोलिस कर्मचार्यांचाही सहभाग असावा जेणेकरून अशी घटना घडल्यानंतर महिला पोलीस कर्मचारी संशयित महिलांची तपासणी करू शकतील अशी मागणी व्यापारी वर्गात होत आहे.
परळीच्या अरुण टाक अँड सन्सवर महिला चोरट्यांचा डल्ला
