बीड : बीड, परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव आणि आष्टी या सहा शहरांचा लॉकडाऊन दि. 21 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजता संपुष्टात येत असल्याने सदरील शहरामधील दुकानदारांनी आपली अस्थापने उघडली, मात्र असे असले तरी गणेत्सवानिमित्त गुरूवारच्या आदेशात जिल्हा प्रशासनाने
या शहरातील काही दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र स्वतंत्र आदेश येईपर्यंत उर्वरित दुकाने उघडता येणार नाहीत, असेही त्या आदेशात स्पष्ट म्हटलेले आहे. तरीही संभ्रमात असलेल्या व्यापार्यांनी ‘नाही होय नाही’ असे म्हणत शनिवारी आपली दुकाने उघडलीच, दुकाने एकदम न उघडता टप्प्या-टप्प्याने गर्दी होणार नाही, याची काळजी घेवून सैल देण्यात येणार आहे. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने उघडण्यास घाई करणे नियमबाह्य ठरू शकते, अशा दुकानांवर कार्यवाही होवू शकते, त्यामुळे परवानगी नसलेली दुकाने व्यापार्यांनी उघडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे, ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठीच जिल्हा प्रशासनाने बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, केज आणि आष्टी शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते, लॉकडाऊनची मुदत संपण्याच्या आधी गुरूवारी जिल्हा प्रशासनाने गणेशत्सवाच्या निमित्ताने या सहा शहरात लॉकडाऊनमधून काही दुकानांना सुट दिलेली आहे. त्यानुसार बीड, आष्टी, परळी, केज, माजलगाव आणि अंबाजोगाईत या शहरात किराणा दुकाने, फळेभाजीपाला, दुध, मेडिकल, गणेश मुर्ती विक्रीचे दुकाने, पुजेचे साहित्य, हारफुलांंची दुकाने आदी घाऊक व किरकोळ विक्रीचे दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, एका बाजूने जिल्हा प्रशासनाने सणासाठी ही दुकाने उघडण्यास परवानगी दिली असली तरी मिठाई, हॉटेल, रेस्टॉरंट, सुशोभीकरण साहित्य विक्री व इतर प्रकारचे दुकाने उघडण्यास बंदी घातलेली आहे. या विषयीचे आदेश स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. त्यामुळे या सहाही शहरात व्यापार्यांना परवानगी न दिलेली दुकाने उघडी करता येणार नाहीत, जिल्हा प्रशासन स्वतंत्र आदेश काढून उर्वरित दुकाने उघडण्यास परवानगी देणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेली दुकाने व्यापार्यांनी उघडू नयेत, जर कोणी दुकाने उघडी असली तर ती नियमांना डावलून उघडण्यात आल्याचे समजले जाईल आणि त्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून आज एक स्वतंत्र आदेश येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगितले जात आहे.