Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोविड हेल्थ केअर सेंटर तात्काळ कार्यान्वित करा ; खा.प्रितमताईंच्या प्रशासनाला सूचना

अंबाजोगाई :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोखंडी सावरगाव येथील कोविड हेल्थ केअर सेंटर तात्काळ सुरू करा अशा सूचना जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे भेट देऊन त्यांनी कोविड केअर सेंटर व निर्माण कार्य सुरू असलेल्या हेल्थ सेंटरची आज पाहणी केली.याप्रसंगी त्यांच्यासोबत अक्षय मुंदडा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासकीय कर्मचारी होते.

मागील दोन दिवसांपासून खा.डॉ.प्रितमताई मुंडे या जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.आज ( दि.२० )लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरला भेट देताना त्यांनी पीपीई किट परिधान करून रुग्णालयाची पाहणी केली.रुग्णांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सूचना करताना रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था व सुविधांची माहिती त्यांनी घेतली.हेल्थ केअर सेंटरच्या पाहणी दरम्यान कामातील त्रुटी व आरोग्य सुविधांबाबत चर्चा करून तात्काळ हेल्थ केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या.कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून हेल्थ केअर सेंटर लवकरात लवकर कार्यान्वित होणे महत्वाचे असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान कोविड केअर सेंटर मधील रुग्णांच्या समस्यांसह याठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्धयांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून रुग्ण व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.आपल्या कार्यशैलीसाठी सर्वसामान्यांमध्ये ‘दबंग खासदार’ म्हणून परिचित असलेल्या खा.प्रितमताई मुंडे यांनी पीपीई किट परिधान करून पाहणी केल्यामुळे “लोकप्रतिनिधीला साजेशी कामगिरी”अशी भावना जिल्ह्यातून व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version