बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : नरेगाअंतर्गत विहिर मंजूर करून त्यावर बीडीओंसह इतरांच्या सह्या घेण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव प्रताप खेडकर (वय 35, रा.तरनळी ता.केज, जि. बीड) यांना 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.13) सांयकाळी करण्यात आली. याबाबत केज ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
तक्रारदाराने 23 डिसेंबर 2025 रोजी तक्रार दिली होती. तक्रारदार व अन्य तिघांच्या शेतजमिनीत एमआरईजीएस योजनेंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये, असा एकूण 1 लाख रुपयांचा खर्च मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारीच्या अनुषंगाने 23 व 24 डिसेंबर 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात सरपंच खेडकर यांनी विहिरीच्या प्रस्तावावर सही करून बीडीओ व इतर अधिकार्यांकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 10 हजार व उर्वरित तिघांकडून प्रत्येकी 20 हजार रुपये, असा एकूण 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 1 जानेवारी 2026 रोजी पहिली सापळा कारवाई करण्यात आली असता आरोपीने थेट रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर 13 जानेवारी 2026 रोजी केज पंचायत समितीच्या पाठीमागील खेडकर यांच्या रूममध्ये सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी तक्रारदाराकडून पंचासमक्ष 70 हजार रुपये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद पोलिस निरीक्षक विजय हनुमंत वगरे यांनी दाखल केली असून पुढील तपास बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक समाधान कवडे करत आहेत.
नरेगाच्या विहीरींसाठी सत्तार हजाराची लाच घेताना सरपंच पकडला, धाराशिव एसीबीची केजमध्ये कारवाई, बीडीओंसह इतरांच्या सह्यांसाठी मागितली होती लाच, तरनळीच्या सरपंचावर गुन्हा दाखल
