Site icon लोकाशा-बंब न्यूज

सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; आता होणार सामायिक परीक्षा

नवी दिल्ली : युवा पिढीच्या नोकरीसंदर्भात मोदी सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था (National Recruitment Agency)स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा (CET) देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल.
शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्ग चोखाळते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि चांगल्या नोकरीच्या महत्त्वाकांक्षेने तरुण या सगळ्या परीक्षा देतात. आता मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली.
आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

उमेदवारांना पुढे जाण्याची संधी

प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, “युवकांना जागोजाही परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”

Exit mobile version