पुरात अडकलेल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर मागविले
राजेंद्र जैन / कडा :- आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्वच नद्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कड्यासह शेरी खुर्द, चोभा निमगाव, घाटा पिंपरी, पिंपरखेड, धानोरा, देवीनिमगाव, डोंगरगण या परिसरात जवळपास 40 ते 45 नागरिक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार बचाव कार्यासाठी नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना एयरलिफ्ट करण्यासाठी नाशिकवरून हेलिकॉप्टर मागविण्यात आले तर पुण्यावरून एनडीआरएफची टीम मदतीसाठी लवकरच दाखल होणार आहे.
आष्टी तालुक्यात पन्नास वर्षात पहिल्यांदाच ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, तालुक्यातील जवळपास सगळ्याच नद्यांना महापूर आला आहे. कडा येथील कडी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने या भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कडा, धानोरा आणि देवी निमगाव येथील पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. नगर बीड महामार्गावरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाली. त्यामुळे अनेक प्रवासी वाहनातच अडकले आहेत. कडा येथील नदीकाठी असलेली ग्रामपंचायत कार्यालय, बसस्थानक परिसर पुराच्या पाण्याने व्यापल्याने काही दुकाने घरे पाण्यात बुडाले आहेत. नदीकाठची घरे, दुकाने रिकामी करून नागरिकांना सुरक्षित हलविण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यातून लष्कराची तुकडी मदत कार्यासाठी मागविण्यात आली आहे तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना एयरलिफ्ट करण्यासाठी नाशिक वरून हेलिकॉप्टरला पाचरण करण्यात आले असून, पुणे एनडीआरएफची टीम मागविण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
———
जैन श्रावक संघाचा पुढाकार
कडा परिसरात ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसामुळे काहींची घरे, दुकाने पाण्यात बुडाली. त्या हवालदिल झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी जैन श्रावक संघाने पुढाकार घेऊन आपत्तीग्रस्तांची जैन स्थानकात जेवणाची व्यवस्था करून सामाजिक दायित्वाची जोपासना केली आहे.
