Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकारी जॉन्सन बनले निक्षय मित्र !, इतरांनीही निक्षय मित्र बनण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी जॉन्सन बनले निक्षय मित्र !

 जिल्ह्यातील इतरांनीही निक्षय मित्र बनण्याचे आवाहन

 प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान

बीड,‍ दिनांक 03 (जिमाका) : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन निक्षय मित्र बनले. जिल्ह्यातील पाच क्षय रूग्णांना जिल्हाधिकारी यांनी सहा महिन्यांसाठी दत्तक घेत त्यांना आज पोषण कीटचे वाटप केले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टीबी मुक्त भारत अभियान, टीबी फोरम व टीबी कोमोर्बीडीटीच्या जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात झाली.
जिल्ह्यात एकूण एक हजार २३९ क्षय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ३५० रूग्णांना निक्षय मित्र यांच्यामार्फत निक्षय पोषण आहार किटचे वाटप करण्यात आलेले आहे. उर्वरित क्षयरुग्णांना निक्षय पोषण आहार कीट उपलब्ध करून देण्यासाठी विविध घटकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. जॉन्सन यांनी केले.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेशकुमार माने, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल चव्हाण, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Exit mobile version