Site icon लोकाशा-बंब न्यूज

पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची ईव्ही कारमधून विधानभवनात एन्ट्री, प्रदुषणमुक्त महाराष्ट्रासाठी दिला प्रतिकात्मक संदेश

मुंबई।दिनांक ३०।
विधीमंडळ अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची विधानभवनात इलेक्ट्रिक वाहनाने धमाकेदार एन्ट्री झाली. प्रदूषण मुक्त महाराष्ट्रासाठी प्रतिकात्मक संदेश देत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

पर्यावरण मंत्री या नात्याने दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा मनोदय व्यक्त करत तशा सूचना त्यांनी काही दिवसांपूर्वी विभागाला दिल्या होत्या, त्यानुसार विभागाकडून महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक कार त्यांना आज उपलब्ध झाली. आजपासूनच विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असल्याने याच ईव्ही कारमधून त्यांनी रामटेक शासकीय निवासस्थान ते विधानभवन असा प्रवास केला, त्यांचेसमवेत नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ हया देखील होत्या. दरम्यान, सकाळी रामटेक निवासस्थान येथे त्यांनी ईव्ही कारची विधीवत पूजा केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना ‘महिंद्रा एक्सईव्ही नाईन-ई’ या माॅडेलची चावी सुपूर्द केली.

प्रदुषणमुक्तीचा दिला प्रतिकात्मक संदेश

विधानभवनात आल्यानंतर यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, पर्यावरण मंत्री या नात्याने प्रदुषण कमी व्हावे यासाठी इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास करत प्रतिकात्मक संदेश देत आहे.या वाहनाने दूरचा प्रवास करणे मला थोडे कठीण जाईल पण मुंबईत तरी ते शक्य होईल, त्यामुळे इव्ही कार वापरण्याचे मी ठरवले. अनेकांना माझं हेच आवाहन असेल की त्यांनी अशा वाहनांचा वापर करावा जेणेकरून वातावरणातील प्रदुषण कमी होण्यास फार मोठी मदत होईल.

Exit mobile version