Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता शेतातील वादांना बसणार आळा, पोलिस अधीक्षक नवनीत काँवतांनी हाती घेतला पोलीस आपल्या बांधावर चा अभिनव उपक्रम


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : आता शेतातील वादांना आळा बसणार आहे. कारण पोलिस अधीक्षक नवनीत काँंवत यांनी पोलिस आपल्या बांधावरचा अभिनय उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून शेतातील तंटे सोडविले जाणार आहेत.
यावर्षी मान्सून पूर्व पाऊस पडला असून शेतीत मशागतीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु झालेले आहे. दरवर्षी अशा कालावधीत शेती, शेतीचा बांध, शेतीचा मालकी हक्क अशा कारणावरून शेतकर्‍यामध्ये वादविवाद सुरु होत असतात. सदर वादाची वेळीच दखल न घेतल्यास त्याच्यात वादविवाद होवून दखलपात्र गुन्हे घडतात. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांचे संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस आपले बांधावर उपक्रम सुरु करण्यात येत आहेत. सदर उपक्रमाबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस अधीक्षक यांनी महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. शेतीचे बांधावरून शेतकर्‍यांमध्ये वादविवाद होवून सदर तक्रारदार पोस्टेस येताच पो. ठा. अधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडे सहानुभूतीपर्वक विचारपूस करावी, तक्रारदार यांच्याकडे  विचारपूस करून त्याप्रमाणे तक्रार नोंदविले वरून संबंधीत बीट अधिकारी व बीट अंमलदार यांना अवगत करावे, बीट अधिकारी व बीट अंमलदार हे प्रत्यक्ष शेतक-यांचे बांधावर जावून झाले प्रकाराची खात्री करावी, गावातील प्रतिष्ठीत इसम, तंटा मुक्तीचे अध्यक्ष, शेताशेजारील शेतकरी पांचेकडे विचारपूस करून तक्रारदार यांना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन करावे, सदर प्रकरणामध्ये बीट अधिकारी/अंमलदार हे आवश्यकतेनुसार प्रभावी प्रतिबंधक कारवाई करतील. या उपक्रमातून मुख्यतः मोठ्या गुन्ह्यांना आळा घालण्याचा प्रयत्न पोलीस विभागाकडून केला जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांना होणारे आर्थिक नुकसान यास प्रतिबंध बसणार आहे. योग्य त्या कायदेशीर मार्गदर्शनाच्या अभावी शेतकर्‍यांचे होणारे नुकसान यातून टळणार आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांचा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष आढावा घेण्यात येणार आहे.

Exit mobile version