Site icon लोकाशा-बंब न्यूज

चाड्यावर मुठ धरत जिल्हाधिकार्‍यांनी केली सोयाबीनची पेरणी, थेट शेतात जावून विवेक जॉन्सन यांनी शेतकर्‍यांचे वाढविले मनोबल  


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शेतकर्‍यांचे मनोबल वाढवण्यासाठी थेट शेतात उतरून चाड्यावर मुठ धरत सोयाबीन पेरणी केली. खंडाळा (ता. बीड) येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात पेरणी केली.
पावसाळा सुरू होताच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असून, त्यांच्या या मेहनतीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवत जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः शेतमळ्यात उतरून सोयाबीनच्या बियाणांची मुठ धरून पेरणी केली. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून शेतीसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी विभागाच्या वतीने योग्य बियाणे, खतांचा पुरवठा व सल्ला वेळेत मिळावा, यासाठीही सूचना देण्यात आल्या. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, जिल्हाधिकार्‍यांच्या या सकारात्मक भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानंतर खंडाळा गावाची पाहणी केली व नंतर महावितरणचे विद्युत पोलची व गावातील विद्युत तारा याची देखील पाहणी केली.

Exit mobile version