Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोकनेते मुंडे साहेबांच्या अभिवादनासाठी उद्या गोपीनाथगडावर उसळणार अलोट गर्दी, गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा ; मोठया संख्येने उपस्थित रहा -ना.पंकजाताई मुंडेंनी दिलं सर्वांना निमंत्रण

परळी वैजनाथ । दिनांक ०२।
आपल्या लाडक्या लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी उद्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळणार आहे.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असून ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तनाचा सर्वांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

गोपीनाथगड येथे स्मृतीदिनाची जय्यत तयारी झाली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर अफाट प्रेम करणारे राज्यभरातील असंख्य मुंडेप्रेमी यादिवशी गोपीनाथगड येथे नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करणार आहेत.राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह मुंडे कुटुंबीय आणि राज्यभरातून असंख्य मान्यवर स्मृती दिनानिमित्त गोपीनाथगड येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गडावर रक्तदान शिबीर, वाहन चालकांची आरोग्य तपासणी, पशूसंवर्धन कॅम्प, जनावरांना औषधांचे वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ढोक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन
-‐——-
सामाजिक उपक्रमा बरोबरच उद्या दुपारी १२ ते २ वा. यावेळेत प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गडावर येणाऱ्या मुंडे भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा ; मोठया संख्येने उपस्थित रहा
ना.पंकजाताई मुंडेंनी दिलं सर्वांना निमंत्रण

परळी वैजनाथ,।दिनांक ०२।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुण्यतिथी दिन म्हणजेच तीन जून हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा पारिवारिक कार्यक्रमासून हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले असुन सर्वांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहे.
याबाबत ना. पंकजाताई मुंडे यांनी एका व्हिडिओद्वारे सर्व मुंडे प्रेमींना आवाहन केले आहे. 3 जून हा दिवस उजडूच नये असे आपल्या सर्वांनाच वाटते. मात्र गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारावर मार्गक्रमण करून प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी तीन जूनला आपण सर्वजण मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर येत असता. त्या दृष्टिकोनातून यावर्षीही तीन जून रोजी पारंपरिक पद्धतीने हा पुण्यतिथी दिन साजरा केला जाणार आहे. रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन व महाप्रसाद असा हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा पारिवारिक कार्यक्रम आहे.तरी सर्वांनी तीन जून रोजी सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर उपस्थित राहावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
••••

Exit mobile version