Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

बीड, दि. २३ : बीड जिल्ह्यात सध्या अवकाळी पाऊस तांडव करत आहे, या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांबरोबरच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे, जिल्ह्यातील या परिस्थितीची जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीने दखल घेतली आहे, त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संबंधित यंत्रणेला दिले आहे आहेत.

नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी. यासाठी शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पथके गठीत करून ही कार्यवाही गतीने पूर्ण करावी असे निर्देश सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत आहे. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी सन २०२३- २०२४ या वर्षात ५४ लाख ८० हजार पात्र शेतकऱ्यांना ४ हजार ८३३ कोटी (चार हजार आठशे तेहतीस कोटी ) रूपये तर २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात ६९ लाख ३ हजार शेतकऱ्यांना ६ हजार ९८९ कोटी ( सहा हजार नऊशे एकोणनव्वद) आणि १ एप्रिल २०२५ ते आतापर्यंत ९ लाख ७ हजार शेतकऱ्यांना ९७५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी म्हटले आहे. वास्तविक पाहता बीड जिल्ह्यातही अवकाळी पावसाने सध्या चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे,या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे , या अनुषंगाने आता जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या यंत्रणेला दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातली यंत्रणा कामाला लागली आहे.

Exit mobile version