बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : एका बाजूने गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने बीड जिल्हा बदनाम होत आहे. मात्र दुसर्या बाजूने याच बीडची मान जगात उंचविण्याचे काम केजच्या प्रियंका इंगळे या खेळाडूने केले आहे. भारताने पहिल्या खो-खो विश्वचषकावर आपलं नाव कोरत इतिहास घडवला आहे. दिल्लीमध्ये रविवारी (19 जानेवारी) पहिल्या खो-खो विश्वचषकातील महिला गटाचा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात भारत आणि नेपाळ समोरसमोर होते. या सामन्यामध्ये बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळवर 38 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. या स्पर्धेत भारत विश्वविजेता ठरला आहे. या यशाबद्दल प्रियंका इंगळेंवर बीडसह संपुर्ण देशभरातून कौतूकाची थाप पडत आहे.
भारतीय महिला खो-खो संघ पहिल्या सामन्यापासूनच वरचढ ठरत होता. पहिल्या सामन्यात महिला संघाने तब्बल 176 गुणांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. अंतिम सामन्यात मात्र भारतासमोर नेपाळचं आव्हान होतं. हे आव्हान स्वीकारत महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय महिला संघ आघाडीवर होता. तेव्हा 34-0 च्या अंतराने नेपाळचा संघ पिछाडीवर होता. पुढे नेपाळच्या महिला खेळाडूंनी दबाव टाकत गुणसंख्या 35-24 वर नेली. दुसर्या टप्प्यावर काहीसा वरचढ ठरलेला नेपाळचा संघ तिसर्या टप्प्यात मागे पडला. तर भारताच्या लेकींनी पुन्हा आघाडी घेत आणखी 38 गुण मिळवले. चौथ्या टप्प्यात नेपाळने आक्रमणाला सुरुवात केली. पण भारतासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भारतीय संघाने 78-40 अशा गुणांच्या फरकाने नेपाळच्या महिला संघावर मात केली आणि पहिल्या खो-खो विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे केजच्या प्रियंका इंगळेंने या सामन्यातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
प्रियंका इंगळेंची कर्णधार म्हणून नेत्रदिपक
कामगिरी
सदरील महिला खो खो टीमचे कर्णधारपद बीड जिल्ह्यातील कळमअंबा (ता.केज) ची लेक पियंका इंगळे हिच्याकडे आहे. कर्णधार म्हणून तिने नेत्रदिपक कामगिरी करत या स्पर्धेत भारताला विश्वविजेता केले आहे. याबद्दल तिचे बीड जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.
सामना कठीण पण सुरुवातीपासूनच
भारताचे राहिले वर्चस्व
भारतीय संघासाठी हा सामना कठीण मानला जात होता कारण त्यांच्याप्रमाणेच नेपाळ देखील एक मजबूत खो-खो संघ आहे, परंतु भारतीय महिलांनी पहिल्या फेरीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले. भारतीय संघाने पहिल्या फेरीत आक्रमण केले आणि बचावात नेपाळी खेळाडूंनी केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला आणि सामन्याची सुरुवात 34-0 च्या मोठ्या आघाडीने केली. दुसर्या वळणावर, नेपाळने आक्रमण केले आणि संघाने आपले खाते उघडले पण भारतीय बचावपटूंनी त्यांना सहजासहजी गुण मिळवू दिले नाहीत. अशाप्रकारे, दुसर्या टर्ननंतर, स्कोअर 35-24 होता.
भारत पहिल्यांदाच ठरला विश्वविजेता
तिसर्या वळणावर, भारताची पुन्हा आक्रमण करण्याची पाळी होती आणि यावेळी टीम इंडियाने आपली आघाडी निर्णायक स्थितीत नेली. यावेळी सुरुवात थोडी संथ असली तरी हाफ टाईमनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमणाचा वेग वाढवला आणि धावसंख्या थेट 73-24 पर्यंत पोहोचली. येथून नेपाळचे परतणे जवळजवळ अशक्य झाले आणि शेवटी हेच घडले. नेपाळच्या आक्रमकांना टर्न-4 मध्ये जास्त गुण मिळवता आले नाहीत आणि भारताने 78-40 च्या गुणांसह सामना जिंकला. त्यामुळे भारताने पहिल्यांदाच महिला संघातून खो-खो स्पर्धेत विश्वचषक जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे.
खो खो मधील विश्वविजय हा भारतीय महिलांच्या
अस्मितेचा सन्मान – कर्णधार प्रियंकाची कृतज्ञता
हा विजय आमच्या टीमवर्कचा आणि भारतीय महिलांच्या अस्मितेचा सन्मान आहे. खो-खो हा खेळ आमच्या परंपरेचा एक भाग आहे आणि आता तो जागतीक पातळीवर पोहोचला आहे. ही भावना खूप अभिमानाची आहे, प्रत्येक लहान मुलीला सांगू इच्छिते की, तुमचं स्वप्न कितीही मोठं असो ते पुर्ण होवू शकते फक्त मेहनत, विश्वास आणि जिद्द पाहिजे, आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरूवात आहे. भारतीय महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी समर्पित आहे, असे कर्णधार प्रियंकाने म्हटले आहे.