Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वामित्व योजनेंतर्गत प्राॅपर्टी कार्डचे वितरण ; बीडमध्ये ना. पंकजाताई मुंडे राज्य सरकारच्या वतीने प्रमुख अतिथी, स्वामित्व योजनेची वीट ना. पंकजाताईंच्या कार्यकाळात रचली हे जिल्हयासाठी भूषणावह – जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा

बीड।दिनांक १८।
केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत पात्र घरमालकांना मालमत्ता कार्डचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पध्दतीने झाले. बीडमध्ये राज्य सरकारच्या वतीने राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन उपस्थित होत्या. दरम्यान ना. पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना या योजनेची वीट रचली गेली होती, आता तिचा कळस झाला आहे,ही संपूर्ण जिल्हयासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे अशा शब्दांत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी त्यांची प्रशंसा केली.

गावातील मिळकतींचे जीआयएस सर्वेक्षण व ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करून घरमालकांना मालमत्ता कार्ड व ई- सनदचे वितरण या योजनेंतर्गत केले जाते. ही योजना सन २०१९ मध्ये ना. पंकजाताई मुंडे ग्रामविकास मंत्री असताना महाराष्ट्रात आखली गेली होती, त्यानंतर संपूर्ण देशभरात योजना लागू झाली,त्याचे रितसर उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल २०२० रोजी केले होते. आज या योजनेंतर्गत मालमत्ता कार्डचे वितरण पंतप्रधानांनी ऑनलाईन पध्दतीने केले.

बीडमध्ये ना. पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रम

बीडच्या कार्यक्रमासाठी ना. पंकजाताई मुंडे हया राज्य सरकारच्या वतीने प्रमुख अतिथी म्हणून ऑनलाईन उपस्थित होत्या.
पंतप्रधानांचा कार्यक्रम होण्यापूर्वी सकाळी ११.३० वा. त्यांच्या उपस्थितीत योजनेचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मनोगत करताना त्या म्हणाल्या, प्राॅपर्टी कार्डची संकल्पना योजना मी मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन अंमलात आणली होती. तेव्हा पंतप्रधान मोदींना सादरीकरण केले होते. आपल्या गावात जमीन व प्राॅपर्टीचे खूप तंटे असतात, ते कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे. पंतप्रधान मोदींनी या योजनेला स्वामित्व हे खूप चांगले नाव दिले आणि यात जिवंतपणा आणला आहे. या योजनेची सुरवात आपल्या जिल्ह्याने सुरू केली ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्व सामान्य लोकांसाठी मोदी खूप चांगल्या संकल्पना आणतात, त्याचाच हा भाग आहे. ही योजना उत्तर प्रदेशने खूप चांगल्या प्रकारे राबवली आहे, त्यापेक्षा काकणभर काम महाराष्ट्राला करायचे आहे असं ना. पंकजाताई म्हणाल्या.

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशंसा

ना. पंकजाताई सन २०१९ मध्ये ग्रामविकास मंत्री असताना ह्या योजनेची संकल्पना पुढे आली, आज या योजनेने मूर्त स्वरूप धारण केले आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासी कळस..असं यात म्हटलं तर वावग ठरणार नाही अशा शब्दांत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ना. पंकजाताईंची प्रशंसा केली.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पाठक यांचेसह निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कृष्णा शिंदे आदी अधिकारी व पात्र लाभार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर ना. पंकजाताई पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेऊन त्यांचे मार्गदर्शन ऐकले.

••••

Exit mobile version