केज -अवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे, तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याचा ताबा एस आय टी कडे देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.प्रोडक्शन वॉरंट दाखवून एस आय टी कराड याचा ताबा घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याची माहिती मिळत असून ही संपत्ती भारताबाहेरही असू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला खंडणीच्या प्रकरणात आणखी १० दिवस सीआयडी कोठडी मागण्यात आलेली आहे.
सरकारी वकील शिंदे हे सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडची बाजू केज कोर्टामध्ये मांडत आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने दहा दिवसांची कोठडी मागितल्याचं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. यापूर्वी वाल्मिकला १४ दिवसांची कोठडी मिळाली होती.
वाल्मिक कराड प्रकरणी परळी बंद!
वाल्मिक कराड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी कराड समर्थकांनी परळी बंद पुकारला. त्यापूर्वी कराड यांच्या आई पारुबाई कराड यांनी देखील परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच कार्यकर्त्यांनी लक्ष्मीबाई टॉवर वर चढून आंदोलन केले. महिलांनी आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन केले.
दरम्यान मंगळवारी केज न्यायालयाने कराड ला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर एस आय टी ने मोक्का अंतर्गत आणि देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक चा ताबा मागितला. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. खुनापूर्वी सरपंच देशमुख यांचाही छळ करण्यात आला होता. अवादा कंपनीविरुद्ध खंडणीचा प्रयत्न थांबवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे खंडणीचे मोठे प्रकरण आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेग आला, त्यानंतर सात आरोपींना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून ते कोठडीत होते.
याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र सीआयडीचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे.