बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाला आता मोठी गती आली आहे. सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक बीड जिल्ह्यात दाखल झाले असून ते केजकडे रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह सीआयडीचे इतर अधिकारी आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे बीडसह संपूर्ण राज्याचे वातावरण तापलेले आहे. याअनुषंगानेच संतोष देशमुख यांच्या हत्येसह खंडणी आणि पवनचक्कीच्या सुरक्षारक्षकाला झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्यात आलेले आहे. त्यानुसार सीआयडीचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे तपास आल्यापासून बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. तर आता सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक प्रशांत बोरूडे हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची अधीक्षक कार्यालयात भेट घेवून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. त्यानंतर ते केजमकडे रवाना झाले आहेत. यावेळी ते हत्या झालेल्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि सीआयडीचे अधिकारीही रवाना झाले आहेत. या सर्व घडामोडीवरूनच सदर प्रकरणाच्या तपासाला आता प्रचंड गती आल्याचे पहायला मिळत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आला वेग, सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक बीड जिल्ह्यात दाखल, एसपींसह सीआयडीचे अधिकारी केजकडे रवाना
