Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावा

बीडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अतिशय तिव्र शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीड आणि परभणीच्या घटनांवरुन खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. बीडची परिस्थिती अशी आहे की एका जिल्ह्यात राष्ट पती शासन लागू करावं लागेल. आपल्या घटनेत तशी तरतूद नाही. पण तिथे नेमकी कशी परिस्थिती आहे, याचा अंदाज यावा म्हणून मी हे म्हणतोय. तिथे सामाजिक राजकीय परिस्थिती गंभीर आहे. तिथे दंगल होईल, लोक रस्त्यावर येतील अशी परिस्थिती आहे असं संजय राऊत म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची भावना आहे. लोकांच्या मनात आक्रोश आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणतेने हत्या करण्यात आली. यात वाल्मिक कराडच मुख्य नाव येत असून तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय गोटातील असल्याचा दावा करण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांनी बीडला गेलं पाहिजे. ते गृहमंत्री आहेत. त्यांच्या लाडक्या धनुभाऊला घेऊन जावं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा आक्रोश जर या सरकारला दिसत नसेल तर हे सरकार माणुसकी शुन्य आहे. त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही असं संजय राऊत म्हणाले.

Exit mobile version