बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज)ः- परळी वैजनाथ शहरातील इंडिया बँकेने तालुक्यातील 15 गावे दत्तक आहेत. या दत्तक गावांतील शेतकर्यांना पीककर्ज पुरवठा या बँकेमार्फत केला जातो. दरवर्षी पीककर्ज जुन, जुलै महिन्यामध्ये वाटप होते. यंदा मात्र या बँकेतील दत्तक गावांना आणखीनही पीककर्ज वाटप झालेले नाही. मूग पीक आता काढण्याची वेळ झाली आहे. मात्र दत्तक गावातील शेतकरी आजही पीककर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.
यंदा मार्च महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भावास सुरवात झाली. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यात टाळेबंदी करण्यात आली. शहर व तालुक्यात एखाद, दुसरा कोरोनाचा रुग्ण आढळून येऊ लागला. मात्र दि.4 जुलैला इंडिया बँकेत सुरु झालेला कोरोनाचा संसर्ग गेल्या महिनाभरात 494 वर जाऊन पोचला आहे. शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शहरात बुधवारपासून (दि.12) संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी दरम्यान दि. 12 ते 16 ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व बँकाही बंद करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून (दि.17) बँकेला खोळंबलेली कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान या बँकेशी संबंधित 15 दत्तक गावांतील शेतकर्यांची पीककर्ज ही आजपर्यंत खोळंबली आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी आपापल्या गावांतील तलाठ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. पण शेतकर्यांनी तलाठ्यांशी संपर्क करुनही आणखीनही कोणत्याच शेतकर्यांना पीककर्ज मिळाले नाही. या गावातील शेतकर्यांना शेतात पेरणी केलेला माल घरी आल्यानंतर पीककर्ज मिळणार का असा प्रश्न या गावातील शेतकरी विचारत आहेत. पीककर्जा संदर्भात नेमके कोणाशी संपर्क करायचा, कारण बँकेत पीककर्ज संबंधित कर्मचारी उपस्थित नाहीत. जर कर्मचारी उपस्थित असला तर आम्ही फोन केला का? फोन आल्याशिवाय बँकेत येऊ नका असे उत्तर दिले जाते. गावानुसार वाटप करण्यात येणार पण नेमका आपल्या गावाचा नंबर कधी येणार, कोणत्या गावचे वाटप झाले, कोणत्या गावातील राहिले याची माहिती नेमकी कळणे आवश्यक आहे. पण बँक व्यवस्थापकाला भेटता येत नाही. यामुळे शेतकरी वार्यावर सोडण्यात आला आहे. शेतकर्यांच्या या प्रश्नांकडे कोण बघणार अशी चर्चा सध्या सुरु आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकर्यांचे पीककर्जाचे प्रस्ताव लवकरात-लवकर निकाली काढून पीककर्ज वाटप तात्काळ करावे, असे आदेश जिल्ह्यातील बँकांना दिलेले आहेत. मात्र तालुक्यातील 15 दत्तक गावातील शेतकर्यांना पीककर्ज कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गामध्ये विचारला जात आहे. संबंधीतांनी शेतकर्यांचे पीककर्ज लवकरात-लवकर वाटप करावे अशी मागणी होत आहे.