बीड दि.20 (प्रतिनिधी):
वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले अध्ययन, अध्यापन केले नाही व आरटीई कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील तीन शिक्षकांना, धारूर तालुक्यातील एका शिक्षकांस पोलीस ठाण्यात असलेल्या गुन्ह्याप्रकरणी, तर केज तालुक्यातील सतत गैरहजर असणारा एक अशा 5 शिक्षकास तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी गुरुवारी दिलेआहेत. एकाच दिवशी पाच शिक्षकांना निलंबित केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील आष्टी (हरिनारायण) येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे अध्यापन न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले. तसेच बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 चा भंग करणे व वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील 3 शिक्षकांना तडकाफडकी निलंबित केले. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा (ह.ना.) येथील निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये 1) अष्टेकर डी.डी. 2) बळे लालासाहेब मल्हारी 3) आणि श्रीमती नाईक नवरे मनीषा धोंडीराम या तीन शिक्षकांचा समावेश आहे.
धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील सहशिक्षक भालेराव डी. डी. यांचे विरुद्ध परळी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25 व 4 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 323, 324, 395, 341, 504 व 506 अन्वये दि. 9 जून 2024 रोजी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर शिक्षक हे शाळा सुरू दि.15 जून 2024 रोजी अनधिकृत गैरहजर असले बाबतचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे डी.डी. भालेराव यांना जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केला आहे. त्यामुळे नियम 1964 मधील नियम 3 मधील तरतुदीनुसार संबंधितांस निलंबित करण्याचे आदेश दि. 20 डिसेंबर रोजी देण्यात आले आहेत.
तसेच केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिसेगाव येथील मुख्याध्यापक राजगिरे बी.के. हे सतत गैरहजर राहिल्या प्रकरणी संबंधीतास तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात 5 शिक्षकांना एकाच दिवशी निलंबित केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.