बीड (प्रतिनिधी):- छोटयाशा खेड्यागावातून पत्रकारितेची सुरुवात करणारे मनमिळावू, हसतमुख लोकपत्रकार चंद्रकांत उध्दव साळूंके यांचे आज मंगळवार दि.12 नोव्हेंबर रोजी सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले.
बीड तालुक्यातील नागापूर (खु) या खेडेगावातून येवून पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न रोखठोकपणे मांडून ते सोडविण्याची तळमळ असणारे बातमीदार ते उपसंपादक म्हणून काम करणारे हसतमुख, मनमिळावू लोकपत्रकार चंद्रकांत साळूंके यांचे मोटारसायकलवरुन गावी जात असतांना शुक्रवार दि.8 नोव्हेंबर रोजी अपघात झाला. प्राथमिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र चंद्रकांत साळुंके यांची गंभीर परिस्थिती पाहता त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. गेली पाच दिवस ते घाटी रुग्णालयात उपचार घेत होते. आज सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मुळगाव नागापूर (खुर्द) परिसरासह पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून दैनिक सोलापूर तरुणभारत, दै.राजसम्राट, दै.जगमित्र, सायं. दैनिक अभिमान, दै.रणझुंजार, दै.हिंदजागृती अशा विविध दैनिकात त्यांनी आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविलेला होता. तसेच गेल्या 6 वर्षापासून ते सायं.दैनिक बीड सरकारच्या उपसंपादक पदाची धुरा आपल्या खांद्यावर अविरतपणे सांभाळत होते. ते मराठी पत्रकार परिषदेचे बीड तालुका कोषाध्यक्ष होते. नुकतेच त्यांनी स्वत:चे साप्ताहिक आवाज महाराष्ट्राचा हे वृत्तपत्र सुरु केले होते. अत्यंत मनमिळावू व हसतमुख स्वभावाचे पत्रकार चंद्रकांत साळुंके यांच्या निधनाची बातमी लिहितांना अत्यंत दु:ख व वेदना होत आहेत. ग्रामीण व शहरी भागाची नाळ जोडणारा पत्रकार म्हणून चंद्रकांत साळुंके यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. साळूंके परिवारावर कोसळलेल्या दु:खात दैनिक सरकार व मित्र परिवार सहभागी आहे. पत्रकार चंद्रकांत साळुंके यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि.12 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या मुळ गावी नागापूर (खु.) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साळूंके कुटुंबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.