सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड : तांत्रिक विद्या अवगत करून पैशांचा पाऊस पाडतोत व तुला मालामाल करतो, असे म्हणत बीड शहरातील एका लॅब टेक्निशीयनची फसवणूक करून त्याच्याकडून ४५ लाख २३ हजार ३१५ रुपये उकळल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख अझहर शेख जाफर (रा. भारतभूषण नगर, बालेपीर नगर रोड बीड) याला पैशाचा पाऊस पाडून तुला मालामाल करतो, असे आमिष हमीद खान ऊर्फ बाबू करीम खान व इतरांनी दिले. या मांत्रिकांनी शेख अझहर याच्याकडून रोख २४ लाख व फोन पे द्वारे २१ लाख २३ हजार ३१५ रुपये उकळले. आपली याच्यामध्ये फसवणूक झाल्याचे शेख अझहर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी हमीद खान ऊर्फ बाबू करीम खान (रा. जे.के. कॉम्प्लेक्सच्या मागे बार्शी नाका बीड), जिलानी अब्दुल कादर सय्यद (रा. मोमीन गल्ली ता. औसा जि. लातूर), सविता पवार (रा. पुंडलिक नगर औरंगाबाद), शेख समीर शेख अहमद (रा. जालना), उत्तम भागवत (रा. घोलपवाडी ता. इंदापूर जि. पुणे), प्रकाश गोरे (रा. झारकरवाडी ता. इंदापूर जि. पुणे) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.