Site icon लोकाशा-बंब न्यूज

३०७ च्या आरोपीला भेटण्यासाठी पोलिसांनीच घातला धिंगाणा, बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल, धिंगाणा घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

बीड दि.१८ (प्रतिनिधी)- येथील शहर पोलीस ठाण्यात ३०७ प्रकरणातील आरोपीला भेटण्यासाठी थेट चार पोलिसांनीच मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पोलिस कर्मचारीच दारू पिऊन आरोपीला भेटण्यासाठी धूडगुस घालत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

विपुल गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर ३०७, ३२७/२३ भादवि नुसार गुन्हा दाखल आहे. विपुल मागच्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये होता.यावेळी विपुलला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास १० ते १२ जण दारूच्या नशेत आले होते. यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार रेडेकर यांनी या सर्वांना भेटीपासून रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी रेडेकर यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला.विशेष म्हणजे कायद्याची पायमल्ली करण्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा वाटा होता. यात मुख्यालयातील विनायक जोगदंड, आरसीपीमधील श्री. खेडकर, गेवराईचे पोलीस कर्मचारी गणेश कुटे आणि शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप कांबळे यांनी धिंगाणा घातल्यामुळे त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version