Site icon लोकाशा-बंब न्यूज

महाप्रचंड..! भगवान भक्तीगडावरील ऐतिहासिक दसरा मेळावा अतिविराट जनसागराने ओसंडला, आ. पंकजाताई मुंडेंच्या तडाखेबंद भाषणातून मिळाली सर्व सामान्यांना उर्जा, ऊसतोड मजूरांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, कोयते घासून ठेवा, महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लवकरच येणार, मेळाव्यात दिसली सर्व जाती धर्माची व्रजमूठ

पाटोदा ।दिनांक १२।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांचा भगवान भक्तीगडावरील आजचा दसरा मेळावा दरवर्षीच्या परपंरेनुसार ऐतिहासिक असाच ठरला. यंदा मेळाव्यास अतिविराट जनसागर उसळला होता, मागील सर्व रेकॉर्ड गर्दीने मोडून काढले. कोयते घासून ठेवा, लवकरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात येणार आहे, ऊसतोड मजूरांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही असं ठणकावून सांगत वंचितांना, पिडितांना, दलितांना, गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा आ. पंकजाताईंनी यावेळी दिला.

राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर आज पारंपारिक व ऐतिहासिक दसरा मेळावा मोठया उत्साहात पार पडला. हा मेळावा अतिविशाल गर्दीने व लाखोंच्या संख्येने आलेल्या समर्थकांमुळे महाप्रचंड असा झाला. या मेळाव्याला आ. पंकजाताई मुंडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ .प्रीतमताई मुंडे , आर्यमन पालवे, डॉ.सुजय विखे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, आ. नमिता मुंदडा, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, तोताराम कायंदे, ह भ प राधाताई सानप आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांच्या या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणाची सुरवात हिंदी कवितेच्या अर्थपूर्ण चार ओळीनी केली. इन्सान की ही जाती हूं, फिर भी मुश्किल जीना जिती हूं, जातीभेद और पिछडेपन का नित्य जहर जो पिती हूं, कमजोर हो जो चल ना सके, मैं उनकी हाथ की लाठी हूं,
मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू”, असं म्हणत उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “मला लोकनेते मुंडे साहेबांनी वारसा दिला, त्यांनी भगवान गडावरून शेवटंचं वाक्य म्हटलं होतं की, मला गडावरून दिल्ली, मुंबई नाही तर पंकजा दिसते. त्यामधून मला त्यांनी एक संदेश दिला. मला जीवनात काही निर्माण करता आलं नाही. पण मी एक भगवान भक्तीगड उभा केला. मुंडे साहेबांनी दिलेला शब्द मी पूर्ण करून दाखवला. मला येथील जनता जास्त प्रिय आहे. माझ्यावर ज्यावेळी जीएसटीची रेड पडली होती, त्यावेळी या सर्व लोकांनी १२ कोटी रुपये जमा केले होते. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला होता, तेव्हा या लोकांनी जीव दिला. आज माझा मुलगा आर्यमान भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी मुद्दामहून इथं आला आहे असं म्हणत त्याला व्यासपीठावरून बोलावले व म्हणाल्या, आईचे मुलावर किती प्रेम असते परंतू मी त्याला सांगितले आहे की, तुझ्यापेक्षा माझा जीव इथे बसलेल्या सर्व लोकांवर जास्त आहे. मी माझ्या लेकरांपेक्षा तुम्हाला जास्त जीव लावते. मी कुणालाही घाबरत नाही. मंत्री असताना खूप कामे केली. सर्वांना न मागता निधी दिला. ऊसतोड मजूरांच्या मजूरीत भरीव वाढ केली आता या उसतोड कामगारांचे आयुष्य बदलल्याशिवाय शांत बसणार नाही.

आपला डाव खेळायचा की नाही?

मी दसरा मेळाव्याला दर वर्षी आल्यानंतर तुम्हाला सर्वांना साष्टांग नमस्कार घालते. मी तुम्हाला साष्टांग नमस्कार का घालते? कारण माझ्या वडिलांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली. मी विजयी झाल्यावर तुम्ही मला मोठा मान दिला. पण माझा पराभव झाल्यानंतरही तुम्ही मला त्याहीपेक्षा जास्त मान दिला. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी मी प्रत्येक गावागावात आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा की नाही? या मंचावर अठरा पगड जातीचे लोक आहेत आणि समोर सर्व धर्माचे लोक आले आहेत असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं.

जातीपातीचं नाही तर सत्व आणि तत्व जपूनच माझं राजकारण

तुम्हाला वाटतं का माझा पराभव झाल्यामुळे मी थकले आहे. पण मी सांगते घोडा मैदान लांब नाही. संत भगवान बाबांनी ज्या कारणासाठी गड उभारला ते कारण विसरून कधीही राजकारण करणार नाही. गडाचे पावित्र्य नेहमीच टिकून ठेवेन. मी आजपर्यंत कधी जातीपातीच राजकारण केलं नाही. डाग पडू नये याची काळजी घेत सत्व आणि तत्व जपूनच माझं राजकारण असते. राज्यातील कानाकोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पिडीतांना दलितांना गरिबांना त्रास दिला तर त्याचा हिशेब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पंकजाताईंनी मुंडे यावेळी दिला.

क्षणचित्रं

● दसरा मेळाव्यासाठी आ. पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे, आर्यमन पालवे यांचे खास हेलिकॉप्टरने आगमन

● हेलिपॅड ते व्यासपीठापर्यंत आ. पंकजाताई व प्रितमताई यांचे कार्यकर्त्यांकडून वाजतगाजत जेसीबीतून पुष्पवृष्टी करत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत

● व्यासपीठावर येण्यापूर्वी स्मारकातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीचे दर्शन व पूजा करून आ. पंकजाताईंकडून आरती

● व्यासपीठावर येताच आ. पंकजाताईंनी उपस्थित जनसागराला वंदन करत त्यांच्यावर फुलांची उधळण केली

● संत भगवान बाबा स्मारक ट्रस्ट, सावरगाव घाट ग्रामपंचायत तसेच ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीने त्यांचे ऊसाची मोळी व कोयता देऊन स्वागत

● मेळाव्याचे प्रास्ताविक डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी केले. धनंजय मुंडे, सुजय विखे, महादेव जानकर, लक्ष्मण हाके यांची यावेळी समयोचित भाषणे झाली.

● मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून अठरा पगड जातीचे लोकं मिळेल त्या वाहनाने आणि घरची चटणी भाकरी घेऊन अतिशय उत्साहाने प्रचंड मोठया संख्येने सहभागी झाले.

● मेळावा शांततेत, शिस्तीत पार पडला. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता.
••••

Exit mobile version