Site icon लोकाशा-बंब न्यूज

लॉकडाऊन असलेल्या ‘त्या’ पाच शहरातही 18 ऑगस्टपासून अँटीजेन टेस्ट

 
बीड : बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन असलेल्या त्या पाच शहरातील व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये परळी, केज, माजलगाव, अंबाजोगाई आणि आष्टी या शहरांचा समावेश आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तगडे नियोजन केले आहे. त्याअनुषंगानेच बीड, गेवराईप्रमाणे त्या पाच शहरातही 18, 19 आणि 20 ऑगस्ट अशी तीन दिवस व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट होणार आहे. त्याअनुषंगाने या शहरातील व्यापार्‍यांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी  राहूल रेखावार, सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.
    बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा 2500 च्या पुढे सरकला आहे. वाढत चाललेला हा आकडा कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाने सुरूवातीला गेवराई त्यानंतर बीडमधील व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट केली, यामध्ये अनेक व्यापार्‍यांना कोेरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, यादरम्यानच्या काळात कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठीच बीडसह परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव आणि आष्टी या शहरात जिल्हाधिकार्‍यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहिर केले, सध्या अत्यंत कडक पध्दतीने या लॉकडाऊनचे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाचा अंदाज घेण्यासाठी आणि त्याला पुर्णपणे रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सध्या लॉकडाऊन असलेल्या परळी, अंबाजोगाई, माजलगाव, केज आणि आष्टी शहरातही व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट करण्याचे तगडे नियोजन केले आहे. वास्तविकत: ही टेस्ट दि. 17 ऑगस्टपासून होणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता या पाचीही शहरात 18, 19 आणि 20 ऑगस्ट अशी तीन दिवस अँटीजेन टेस्ट होणार आहे, त्यानुसार या पाची शहरातील सर्वच व्यापार्‍यांनी आपली अँंटीजेन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.

Exit mobile version