Site icon लोकाशा-बंब न्यूज

पोलिस अधीक्षकांचा आणखी एक मोठा दणका, बाळराजे दराडेंच्या कारवाईने फटाके विक्रेत्यांचे निघाले दिवाळे, आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या फटाक्यांच्या पाच गोडाऊनवर छापा मारून चार कोटींचा मुद्देमाल केला जप्त

बीड-येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात मागच्या महिन्याभरापूर्वी पदभार घेतलेल्या सपोनि बाळराजे दराडेंच्या कारवायाची जिल्हाभर चर्चा असताना गुरुवारी रात्री आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या फटाक्यांच्या पाच गोडाऊनवर छाप्पा मारून जवळपास चार कोटींचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दराडेंच्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फटाके विक्रेत्यांचे दिवाळे निघाले असून बीड जिल्ह्यात मागच्या अनेक वर्षातील ही मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या हा आणखी एक मोठा दणका मानला जात आहे.
पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यापासून जिल्ह्यात अवैध धंदे,वाळू माफिया,अवैध दारू विक्रीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतं आहेत. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तर मागच्या काही दिवसांपासून सपोनि दराडेंनी कारवाईची हाती घेतलेली मोहीम आणखीन गतिमान केली असून गुरुवारी रात्री लिंबारुई शिवारातील आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या फाटक्याच्या पाच गोडाऊनवर त्यांनी छाप्पा मारला.यावेळी गोडाऊनमध्ये मोठया प्रमाणावर फटाके, बॉम्बसह अतिशबाजीचा बेकायदेशीर साठा आढळून आला आहे.या कारवाईत जवळपास चार कोटींचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याचा अंदाज असून ही कारवाई पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे,श्री. मोराळे, श्री. मुंडे,श्री. जायभाये, शेख यांनी केली.

कठोर कारवाई करणार-दराडे
लिंबारुईमधील गोडाऊनवर फटाक्यांचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या टीमने तिथे छाप्पा मारला. सध्या पाच ही गोडाऊनवरील अंदाजे चार कोटींचा माल पोलिसांच्या ताब्यात आहे.फटाके विक्रीचा परवाना नसलेले व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून सध्या आमचा तपास सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी दिली.

Exit mobile version