Site icon लोकाशा-बंब न्यूज

सीईओ आदित्य जीवने यांचा झेडपीच्या लेटलतीफ अधिकाऱ्यांना दणका, त्या अधिकाऱ्यांना बजावल्या नोटीसा, ….तर कडक कारवाई होणार

बीड

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारून पाच दिवस झाले असताना आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी आपल्या शिस्तप्रिय व कर्तव्य कठोर कार्यपद्धतीचा अनुभव दाखवून दिला आहे. सोमवारी ‘लेटकमर्स’ अधिकाऱ्यांना नोटीसा देऊन यापुढे उशीर झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना तडकाफडकी नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आयएस अधिकारी आदित्य जीवने यांच्या प्रशिक्षणार्थी कालावधीचा अनुभव बीड जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांनी घेतला आहे माजलगाव येथील मुख्याधिकारी पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असताना अतिक्रमण हटाव आणि इतर काही कामामुळे ते चर्चेत आले. जिल्ह्यातील तहसीलदार गटविकास अधिकारी आणि आष्टी पाटोदा आष्टीचे उपविभागीय अधिकारी पदाच्या कार्यपद्धतीचा अनुभव आलेला आहे. जीवने यांनी या सर्वच कार्यालयातील आपल्या कालावधीमध्ये सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत कार्यालयात पूर्णवेळ बसून काम केले आहे. कार्यालय प्रमुख आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडत असेल तर अधिकारी आणि कर्मचारी हे वरिष्ठांच्या कार्यपद्धतीचा अवलंब करतात हे सीईओ जीवने यांनी जिल्ह्यात दाखवून दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीचा अनुभव मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारतात सोमवारी सर्वांना आला. सीईओ आदित्य जीवने हे सकाळी 9.45 वाजता जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आले. सोमवारी सकाळी 10.00 वाजता त्यांनी सर्व विभागप्रमुख कार्यालयात हजर झाले किंवा नाही? याबाबतची खातरजमा करून घेतली. जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. लेटलतीफ आणि एक-दोन गायब असलेल्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ग्रामविकास विभागाचे 1986 च्या नियमावलीनुसार यापुढे विहित कालावधीत पूर्वपरवानगीशिवाय गैरहजर राहिल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्हा परिषदेत परिषदेचे तत्कालीन आयएएस अधिकारी अजित कुंभार यांच्या बदलीनंतर जिल्हा परिषदेला आदित्य जीवने हे आयएएस अधिकारी लाभल्याने आता जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल, अशी अपेक्षा करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी कालावधीमध्ये काम करताना जीवने यांच्या कार्यकुशलतेचा अनुभव नागरिकांना आलेला आहे. पदभार स्वीकारताच, त्यांनी ‘जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील विकासासाठी मोठी संस्था आहे. काम करण्यासाठी मोठी संधी आहे. आपण प्रामाणिकपणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि विविध योजना आणि उपक्रम राबवण्यासाठी काम करू, असे म्हटले. त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा अधिकाऱ्यांना नोटिसा देऊन दणका दिला आहे.

Exit mobile version