Site icon लोकाशा-बंब न्यूज

झेडपीचे सिईओ आदित्य जिवने यांनी पदभार स्वीकारला

बीड दि.26 (प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आणि बीड जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांनी आदित्य जीवने यांचे स्वागत केले.
बीड जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची दिनांक 28 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या रिक्तपदी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांची प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान या पदावर नाशिक येथील सतीशकुमार खडके यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते बीड येथे रुजू झाले नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने दिनांक 23 सप्टेंबर रोजी आदित्य जिवने यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली.
आदित्य जिवने हे 2020 चे आयएएस अधिकारी असून बीड जिल्ह्यात त्यांनी माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार बीड, उपविभागीय पोलिस अधिकारी आष्टी- पाटोदा आदी ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून कालावधी पूर्ण केला. सध्या ते प्रकल्प अधिकारी या पदावर गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होते. शिस्तप्रिय, कार्यतत्पर व कर्तव्यकठोर, अधिकारी म्हणून ओळख आहे.
बीड येथे पदभार स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेतील विविध योजना व उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्वांनी कार्यक्षमतेने व तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version