Site icon लोकाशा-बंब न्यूज

पोलीस भरतीच्या घोटाळ्यात बीड, छत्रपती संभाजीनगरमधील दहा जण गजाआड


बीड :

रायगड जिल्ह्यात यंदा पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना १० ऑगस्ट रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेत 6 उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. या उमेदवारांकडे चिप आढळून आल्या होत्या. पोलिसांनी लगेचच त्या 6 उमेदवारांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना मदत करणारे कोण आहेत, त्याचा सखोल तपास करताना आणखी 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे उमेदवार आणि त्यांना मदत करणारे सर्व मराठवाड्यातील आहेत.

रायगड जिल्ह्यातील 391 पोलीस पदासांठी ऑगस्टमध्ये भरती प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी राज्यातून 4 हजार 747 उमेदवार परीक्षा देत होते. लेखी परीक्षेसाठी पेणमधील परीक्षा केंद्रावर एक आणि अलिबागमधील चार परीक्षा केंद्रावर ५ अशा सहा विद्यार्थ्यांच्या कानात डिव्हाईस आढळले होते. त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात रामदास जनार्दन ढवळे (23, बीड), दत्ता सुभाष ढेंबरे (22, बीड), ईश्वर रतन जारवाल (21, जालना), गोरख गंगाधर गडदे (24, बीड), सागर धरमसिंग जोनवाल (20, छत्रपती संभाजीनगर) आणि शेखर बाबासाहेब कोरडे (27, बीड) या उमेदवारांचा समावेश होता.
दरम्यान, गुन्ह्यांचे गांभीर्य पाहून कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा करून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड व इतर पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तातडीने विशेष तपास पथक नेमून त्यांना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाठवून आरोपींना मदत करणाऱ्यांचा कसोशीने शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे मदतीसाठी सायबर विशेष पथकाची देखील नेमणूक करून त्यामध्ये सायबरचे उत्तम ज्ञान असणारे पोलीस अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांनी अथक मेहनत घेऊन आरोपी उमेदवारांना मदत करणाऱ्या 10 आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींमध्ये पवन त्रंबक बमनावत (25, नळणी, जालना), नारायण निवृत्ती राऊत (29, नाळवंडी, बीड), प्रताप ऊर्फ भावड्या शिवसिंग गोमलाडू (25, वैजापूर, छ.संभाजीनगर), नागम्मा हनुमंत इबीटदार (20, देगलूर, नांदेड), अर्जुन नारायण बेडवाल (24, परसोडा, छ. संभाजीनगर), मंगेश बालाजी चोले ऊर्फ चोरमले सर (34, जळकोट, लातूर), संतोष सांडू गुसिंगे (30, पैठण, छ. संभाजीनगर), पूनम राम वाणी (23, पडेगाव, छ. संभाजीनगर), जीवन मानसिंग नायमने ऊर्फ एस. राठोड ऊर्फ करण जाधव (जोडवाडी, छ. संभाजीनगर), जालींदर श्रीराम काळे (32, नाळवंडी, बीड) यांचा समावेश आहे. अजूनही इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Exit mobile version