Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालता कामा नये, एसपी अविनाश बारगळ यांची ठाणेदारांना तंबी, पदभार स्विकारताच आढावा बैठकीतून ठाणेदारांना केल्या कडक सुचना, तडीपार, एमपीडीए सारख्या कडक कारवया करून गुन्हेगारांची दादागिरी संपविण्याच्याही स्पष्ट सुचना, एसपींच्या सुचनेनंतर ठाणेदार लागले कामाला


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची नुकतीच बदली झाली आहे, त्यांच्या जागी आता अविनाश बारगळ यांची नियुक्ती केली आहे, त्यानुसार बारगळ यांनी शनिवारी सकाळी बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. याचअनुषंगाने त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि ठाणेदारांची बैठक घेवून त्यांना कडक सुचना केल्या आहेत. जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालता कामा नये, अशी तंबीच यावेळी श्री. बारगळ यांनी ठाणेदारांना दिली आहे. यासाठी ठाणेदारांना डेडलाईनही देण्यात आली आहे. ज्याठिकाणी अवैध धंदे चालतील त्या ठिकाणच्या ठाणेदारावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर तडीपार, एमपीडीए सारख्या कडक कारवया करून जिल्ह्यातील गुन्हेगारांची दादागिरी कायम संपुष्टात आणावी, असे आदेशही यावेळी श्री. बारगळ यांनी सोडले आहेत. एसपींच्या याच सुचनेनंतर जिल्ह्यातील सर्व पोलिस अधीकारी आणि ठाणेदार गतीने कामाला लागले आहेत.
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यात जवळपास 26 महिणे कर्तव्य बजावलेले आहे. आपल्या या कार्यकाळात श्री. ठाकूर यांनी अगदी चोख पध्दतीने काम करून बीड जिल्हावासियांची सेवा केलेली आहे. त्यांचा बीड जिल्ह्यातील कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे आणि आगामी विधानसभेच्या निवडणूकीमुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी अमरावती येथे कर्तव्य बजावणारे कर्तव्यदक्ष अधीकारी अविनाश बारगळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी शनिवारी सकाळी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार नंदकुमार ठाकूर यांच्याकडून स्विकारला, त्यानंतर श्री. बारगळ यांनी आपल्या कामाला सुरूवात केली. शनिवारी त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधीकारी आणि ठाणेदारांची बैठकही घेतली आहे. या बैठकीत त्यांनी संपूर्ण बीड जिल्ह्याचा आढावा घेतला. यापुढे जिल्ह्यात एकही अवैध धंदा चालता कामा नये, कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे बंदच झाले पाहिजेत यासाठी श्री. बारगळ यांनी ठाणेदारांना डेडलाईनही दिली आहे. जर अवैध धंदे बंद झाले नाही तर ठाणेदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर पोलिस हा जनतेचा सेवक आहे, जनतेच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी पोलिसांवर असते त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही गुंडाची दादागिरी खपवून घेवू नका, अशा गुंडांवर तडीपार, एमपीडीएनुसार कारवाई करा, अशा स्पष्ट सुचना यावेळी श्री. बारगळ यांनी दिल्या आहेत. तसेच बदल्या झालेल्या कर्मचार्‍यांना तात्काळ नव्या बदलीच्या ठिकाणी सोडावे,
जर असे झाले नाही तर त्या कर्मचार्‍यांना नियंत्रण कक्षात नियुक्त केले जाईल, असेही यावेळी श्री. बारगळ यांनी म्हटले आहे. अगदी पहिल्याच बैठकीत पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ अ‍ॅक्शन मोडवर दिसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस अधीकारी आणि ठाणेदार आता श्री. बारगळ यांच्या सुचनेप्रमाणे गतीने कामाला लागले आहेत.  यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मिना, डीवायएसपी विश्‍वांभर गोल्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्माण शेख, ठाणेदार शितलकुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड, श्री. खेडकर, उमेश कस्तूरे, वाहतूक शाखेचे सुभाष सानप यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

प्रत्येक नागरिकांशी सन्मानाने वागा
पोलिस ही जनतेची सेवक आहे, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे, त्यामुळे त्यांच्याशी चांगलं वागा आणि त्यांची सुरक्षा करा, तक्रारदारांना न्याय मिळेल अशी सकारात्मक भुमिका ठेवा, अशाही सुचना यावेळी श्री. बारगळ यांनी केल्या आहेत.  

अवैध धंदे बंद न झाल्यास
ठाणेदारांवर कारवाई
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ठाणेदारांना एक डेडलाईन दिली आहे. त्यामुळे जर अवैध धंदे बंद झाले नाही तर संबंधित ठाणेदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा ईशाराही यावेळी श्री. बारगळ यांनी दिला आहे.

विधानसभेच्या निवडणूकीवर एसपींचे
बारीक लक्ष
विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे, ही निवडणूक जिल्ह्यात अत्यंत शांततेत पार पडावी, याअनुषंगाने पोलिस अधीक्षकांचे प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष असणार आहे. हीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी या बैठकीत पोलिस अधीकारी आणि ठाणेदारांना अनेक सुचनाही केल्या आहेत.

दाखल झालेला प्रत्येक गुन्हा गतीने उघडकीस आणा
गुन्हे दाखल होतात मात्र ते उघडकीस येत नाहीत, यामुळे पोलिस प्रशासनावरील विश्‍वासही ढळमळतो, त्यामुळे दाखल झालेला प्रत्येक गुन्हा गतीने उघडकीस आला पाहिजे, तसेच शिक्षेचे प्रमाणही वाढले पाहिजे, यासाठी ज्या काही उपाय-योजना कराव्या लागतील, त्या पावलोपावली कराव्यात, अशाही स्पष्ट सुचना यावेळी श्री. बारगळ यांनी ठाणेदारांना दिल्या आहेत.

Exit mobile version