Site icon लोकाशा-बंब न्यूज

तुमचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी माझी ; एकजुटीची ताकद अशीच कायम ठेवा, वंचितांचा वाली अन् वाणी बनण्यासाठीच मी राजकारणात, आ. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताला भगवान भक्तीगडावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी ; जणू पुन्हा एकदा दसरा मेळावा आठवला, राष्ट्रसंत भगवान बाबांसमोर पंकजाताई नतमस्तक ; ऊसतोड मजूराने पेढेतूला करून संकल्प केला पूर्ण

तुमचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी माझी ; एकजुटीची ताकद अशीच कायम ठेवा

वंचितांचा वाली अन् वाणी बनण्यासाठीच मी राजकारणात

आ. पंकजाताई मुंडे यांच्या स्वागताला भगवान भक्तीगडावर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी ; जणू पुन्हा एकदा दसरा मेळावा आठवला

राष्ट्रसंत भगवान बाबांसमोर पंकजाताई नतमस्तक ; ऊसतोड मजूराने पेढेतूला करून संकल्प केला पूर्ण

सावरगांव घाट ।दिनांक २९।
पक्षाने आपल्याला सन्मान व स्वाभिमान दिला आहे. याचा वंचितांच्या कल्याणासाठी उपयोग करू. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकारणाचा पायाच वंचितांचा न्याय करणे अशा पद्धतीचा आहे. ज्यांचा कोणी वाली व वाणी नाही त्यांचा खंबीर आवाज बनण्यासाठीच मी राजकारणात आहे. वंचित, उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठीच माझं आयुष्य समर्पिलेले आहे. पंकजा मुंडे मोठी कधीच नाही, तुम्ही जी जनशक्ती पाठीशी वेळोवेळी उभे करता ती शक्तीच आपले मोठेपण आहे. मला आज तुमच्याकडून एक वचन पाहिजे, तुमच्या लेकीला एक वर्ष द्या, तुमचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी माझी आहे. आपसातील भांडण, तंटे विसरा एकजुट व्हा, एकीची ताकद अशीच कायम ठेवा एवढं वचन मला द्या अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरून साद घातली.

विधानपरिषदेची आमदार म्हणून रविवारी शपथ घेतल्यानंतर पंकजाताई मुंडे यांचे आज प्रथमच  जिल्ह्यात आगमन झाले. राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर जाऊन पंकजाताई मुंडे यांनी माल्यार्पण करून राष्ट्रसंत भगवान बाबांचे दर्शन घेतले. यावेळी भगवान बाबांच्या पुतळ्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टीही करण्यात आली. या ठिकाणी विराट जनसमुदायासमोर नतमस्तक होत व आपल्या पदराने या जनशक्तीची दृष्ट काढत पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांशी आत्मियतेने मनमोकळा संवाद साधला. 

याप्रसंगी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, भगवान भक्तीगडाची हीच माती आहे, जी माती कपाळी लावून इथे हा वंचितांचा गड निर्माण केला. याच मातीतून नवी उभारी घेण्याचे बळ व आशीर्वाद भगवान बाबांमुळे मला मिळाले. जीवनात ज्यावेळी कठीण प्रसंग उभे राहिले ,काय करावे ? हे सुचत नव्हते अशा वेळी भगवान बाबांनीच बुद्धी दिली आणि लेकरा माझ्या गावाकडे ये असा निरोपच जणू पाठवला. या पद्धतीने आपण सर्वजण एका रात्रीतून लक्षावधी जनशक्तीसह भगवान भक्ती गडाकडे वळलो. ही आपली ताकद आहे.

ही लेक तुमच्यामुळेच मोठी

पंकजा मुंडे कधीच मोठी नव्हती व कधीच मोठी असणार नाही, तुमची माझ्या पाठीशी असलेली ही एकजूट व एकसंघ जनशक्ती हीच सर्वश्रेष्ठ असून याचे ऋण कधीही फिटणार नाही. नुकतीच विधान परिषदेवर पक्षाने मला संधी दिली. सर्वांना समाधान व आनंद वाटला. परंतु व्यक्तीश: पंकजा मुंडेंना काय मिळाले तर पक्षाने मला त्यासाठी पात्र समजले व ही संधी देऊन एक प्रकारे सन्मान व स्वाभिमान दिला.ही सन्मानाची भावनाच प्रत्येकाला ऊर्जा प्रदान करणारी असते. या संधीतून वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे ध्येय आपले असून त्यासाठीच आपण राजकारणात असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.

तुमचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी माझी

तुमच्या एकजुटीला वारंवार कोणाची नजर लागू नये यासाठी मला दृष्ट काढावी लागते असे म्हणत त्यांनी आपल्या पदराने उपस्थित जनसामुदायाची दृष्ट काढली. आपला उत्साह व ताकद बुद्धीने वापरावी लागेल. तुमच्या लेकीला तुमचे एक वर्ष द्या मग बघा काय घडते ते! तुमचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी माझी आहे असा शब्द मी तुम्हाला देते असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

एकजूट आहेच एकजीव व्हा

आपली खरी ताकद ही आपली एकजूट आहे. कोणत्याही जाती, धर्म ,पंथ पक्ष या पलीकडे जाऊन ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे. एकजूट तर आपण ठेवलेलीच आहे मात्र सर्व समाज घटकांना व सर्व समावेशक लोकांना सोबत घेऊन आपल्याला राजकीय वाटचाल करायची आहे. यासाठी ही एकजूट एकजीवाने आपल्याला करावी लागणार आहे. त्यामुळे एकजूट तर आहेच मात्र आपण एकजीव व्हा असं आवाहनही यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले.

क्षणचित्रं

● आमदार झाल्यानंतर पंकजाताई मुंडे प्रथमच जिल्ह्यात आल्याने बीड व नगर जिल्हयातून कार्यकर्ते मोठया संख्येने गडावर
जमा झाले होते, गडाला जणू दसरा मेळाव्यासारखे स्वरूप आले होते.

● समर्थकांनी केलेल्या आत्महत्येमुळे आपण हार तुरे, सत्कार स्वीकारणार नाही असं पंकजाताईंनी जाहीर केलं होते, त्याच पालन करत कार्यकर्त्यांनी त्यांचं फक्त घोषणा देऊन स्वागत केलं.

● पंकजाताईंनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा व आरती केली. जेसीबीतून त्यांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

● किन्ही येथील ऊसतोड मजूर भीमराव वनवे यांनी पंकजाताईंच्या वजनाएवढी पेढेतुला करून आपला संकल्प पूर्ण केला.

● आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार भीमराव धोंडे यांचेसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
••••

Exit mobile version