पुणे, दि. 20 (लोकाशा न्यूज) : महायुती सरकारने आता पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अडीच लाखांच्या आतमध्ये उत्पन्न प्रत्येक महिलेला दरमहिना 1500 हजार रूपये मिळणार आहेत. या याजनेची सर्वत्र चर्चा झाली मात्र विरोधकांनी भावांसाठी काही आहे की नाही असं म्हणत सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सरकारने मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेचीही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सरकार योजना आणत असल्याची टीका विरोधक करू लागलेत. अशातच लाडकी बहीण योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील भगिनींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 4 लाख 29 हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादा बोलले. ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेल्या महिला भगिनींनादेखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येईल. योजनेसाठी प्रत्येक महिन्यात साधारण 3 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात अर्ज भरण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी 25 हजार कोटींची तरतूद, अर्थमंत्री अजित पवारांनी केली घोषणा, योजनेसाठी प्रत्येक महिन्याला येणार 3 हजार 500 कोटी रूपयांचा खर्च
