मुंबई, बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि त्यासाठी होत असलेली आर्थिक लूट लक्षात घेता आता या योजनेच्या लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी नवं अॅप डेव्हलप करण्यात आलं आहे. त्यामुळं ज्या महिलांना अर्ज करताना अडचणी येत आहेत त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वास्तविकत: सरकारने निर्णय जाहिर करताच या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले आहे. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल त्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही, त्यांनी ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे.
नारीशक्ती दूत असं या अॅपचं नाव आहे. ही योजना लागू झाल्यानंतर लगेचच हे अॅप सुरु होणार होतं परंतू तांत्रिक कारणांमुळं ते बंद ठेवण्यात आलं होतं. पण आता यातील तांत्रिक तृटी दूर करण्यात आल्या आहेत. या अॅपच्या माध्यमातून आता लाडकी बहीण योजनेसाठी घर बसल्या अर्ज करता येणार आहे. यामध्ये आता उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम देखील सुरु करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत हे अॅप अपडेट होणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. त्यात सुरुवातीला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचं आहे. त्यानंतर त्यातील प्रोफाईलमध्ये आपली माहिती भरुन नोंदणी करायची आहे. यामध्ये तुम्ही कुठल्या गटात बसता याचा पर्याय निवडायचा आहे. यामध्ये बचत गटाचे सदस्य, गृहिणी आणि इतर असे पर्याय आहेत. या सर्व गोष्टी यशस्वीरित्या जर भरल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. याच शासन निर्णयाची दखल घेवून जिल्हाप्रशासन या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरसावले आहे. त्याअनुषंगानेच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना महत्वाचे आवाहन केले आहे. 28 जूनपासून अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार पात्र महिलांना अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची सरकारने अत्यंत सोप्या पध्दतीने करून दिली आहे. त्यानुसार ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येतात त्यांनी ऑनलाईन करावेत, ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाहीत त्यांनी ऑफलाईन अर्ज करावेत, अर्ज करण्यासाठी कोणताही खर्च येणार नाही, त्यामुळे गडबड आणि गोंधळ न करता जिल्ह्यातील पात्र महिलांनी या योजनेसाठी विहीत नमुन्यात अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले आहे.