Site icon लोकाशा-बंब न्यूज

पराभव जिव्हारी लागल्याने आणखी एका तरूणाची आत्महत्या ; पंकजाताई मुंडे व्यथित, वारणीत अंत्यविधीला हजेरी ; गणेश बडेच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

शिरूर कासार ।दिनांक १६।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने एका तरूणाने गळफास घेऊन स्वतःला संपवले. तालुक्यातील वारणी येथे दुपारी ही घटना घडली. हरिभाऊ उर्फ गणेश बडे असे या तरुणाचे नाव आहे. पंकजाताई मुंडे यांनी सायंकाळी वारणी येथे त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहून बडे परिवाराचे सांत्वन केले.

लोकसभेत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने तालुक्यातील वारणी येथील गणेश उर्फ हरिभाऊ बडे (वय ३०) या तरूणाने दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली. पंकजाताई मुंडे आज बीड दौर्‍यावर होत्या, त्यांना हे  समजताच त्या तातडीने वारणीत पोचल्या. सायंकाळी त्यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून गणेशच्या परिवाराचे सांत्वन केले.

कृपा करून अशी पावलं उचलू नका

कोणत्याही नेत्यावर अशी वेळ येवू नये ती माझ्यावर आली. अशा घटना समजण्या पलिकडे आहेत. मुंडे साहेबांच्या चितेसमोर मी शपथ घेतली होती मी रडणार नाही लढणार पण या ज्या घटना घडत आहेत, त्यात मी स्वतःला सावरू शकले नाही. मी कशाच्या जीवावर लढू. माझेसाठी माझा कार्यकर्ता महत्वाचा आहे. गणेशच्या आत्म्याला शांती मिळो, त्याच्या परिवाराला मी आधार देईल. वाऱ्यावर सोडणार नाही. माझी विनंती आहे, कृपया करून अशी पावलं उचलू नका. आपल्या मुला बाळांना, परिवाराला सोडून जावून नका अशा शब्दांत पंकजाताईंनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version