बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : बीड शहरामध्ये अलीकडच्या काळात औषधी गोळ्या नशेचे द्रव्य म्हणून विकल्या जात आहे. यातून तरुण पिढी आणि बरीच लहान मुले सुद्धा व्यसनाधीन होत आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबद्दल पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदाराने बातमी दिली होती की, एक तरुण नामे शेख नासीर शेख बशीर, हल्ली मुक्काम कांकलेश्वर मंदिर जवळ हा जुना बाजार भागामध्ये गुपचूपपणे हा नशेच्या गोळ्या आणि औषधी विकत आहे आणि तो नॅशनल उर्दू स्कूल समोर आता मुद्देमाल घेऊन थांबलेला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना पाहून मुद्देमाल जागेवरच सोडून पळून गेला. मुद्देमालात अल्प्राझोलम नावाचे औषध असलेला आणि कोडींग फॉस्फेट नावाचे खोकल्याचे औषध असलेला औषधी साठा त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. हा साठा एवढा मोठा होता की ज्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त गोळ्या आणि शंभर पेक्षा जास्त बाटल्या खोकल्याच्या समाविष्ट होत्या. त्याची किंमत 26 हजार रुपयांच्या पुढे जाते. याकामी छापा टाकण्यासाठी औषध निरिक्षक जीवन दत्तात्रय जाधव बीड यांची मदत घेण्यात आली आणि त्यांच्या तक्रारीवरून यामध्ये एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सर्व औषधी कुठून आणली याचा शोध घेण्यात येणार आहे आणि ज्यांनी ही औषधी पुरवली त्यांनाही प्रमुख आरोपी करण्यात येणार आहे. यामध्ये यास मदत करणारे सर्वांना आरोपी करण्यात येणार आहे.