परळी ।दिनांक १३।
बीड लोकसभा निवडणूकीतील भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे व कुटुंबियांनी आज नाथरा येथे मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या आधी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
ना. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, भगिनी खा. डॉ. प्रितमताई मुंडे, यशःश्रीताई मुंडे यांनी प्रथम सकाळी दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि नाथ्रा येथे ग्राम दैवत पापनाशेश्वराचे दर्शन घेऊन सकाळी ११.०५ वा. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. सकाळपासूनच वातावरणात उष्णता जाणवत होती तरीही मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत होते. जागोजागी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील जनता नेहमीच विकासाच्या बाजूने राहिली आहे, जातीपातीला त्यांनी कधीच थारा दिला नाही. या निवडणूकीतही तेच दिसले. मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. जनतेचा आशीर्वाद मला असल्याने विजय निश्चित आहे.
••••