Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जवळील उड्डाणपूल, स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लावणार -ना.नितीन गडकरी, रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या मागणीची घेतली दखल

बीड (प्रतिनिधी)
दि.१० : शहराजवळील उड्डाणपुलांसह स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा रस्ते, वाहतूक व दळणवळण केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी ना.नितीन गडकरींना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्यांची दखल घेऊन ना.गडकरी यांनी ही घोषणा केली.

भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची माजलगाव येथे शुक्रवारी (दि.१०) जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर ना.गडकरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रकाश सोळंके, आ.लक्ष्मण पवार आदींची उपस्थिती होती.

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सोलापूर-धुळे (एन.एच.52) महामार्गावर बीडजवळ छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने महालक्ष्मी चौक व सोलापूरच्या दिशेने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे अपघात वाढले आहेत. प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने व दळणवळणच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी उड्डानपूल करणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत रस्ते, वाहतूक व दळणवळण विभागाला यापूर्वीही निवेदन दिले आहे. तसेच, बीड बायपासकडून तेलगावकडे जाणारा आणि पिंपळनेरकडे जाणारा स्लिप रोड करणे गरजेचे आहे. हा बीडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती डॉ.योगेश क्षीरसागर यांनी ना.नितीन गडकरी यांच्याकडे केली. दरम्यान, मागणीची दखल घेऊन ना.गडकरी यांनी आपल्या भाषणात बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, मी बीडजवळील उड्डाणपुलासह स्लीप रोडचा प्रश्न मार्गी लावणारच, अशी घोषणा त्यांनी केली.

चौकट
डॉ.योगेश क्षीरसागरांचा सातत्याने पाठपुरावा; अजितदादा पवार, ना.धनंजय मुंडेंची शिफारस

परळी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बीड शहराजवळील उड्डाणपुलांसह स्लिप रोडचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने दोघांनीही रस्ते, वाहतूक व दळणवळण विभागाकडे शिफारस केली होती. तसेच, पंकजाताई मुंडे यांनी हा प्रलंबित प्रश्न ना.नितीन गडकरींच्या कानावर घातला. उड्डाणपूल, स्लिप रोडसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांचा सातत्याने सुरू आहे. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत आहे.

Exit mobile version