Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास करण्यासाठीच माझी उमेदवारी, जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा; बीड दौऱ्यात पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास, लोकनेते मुंडे साहेबांच्या संस्काराच्या शिदोरीवरच सर्वसामान्यांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल

बीड ।दिनांक ०८। जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा विकास करण्यासाठी भाजप महायुतीकडून माझी उमेदवारी आहे. यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात मी काम केलेले आहे. हे काम करताना जिल्ह्यातील सर्व घटकांचा विकास हेच ध्येय समोर ठेवून जनतेची कामे मार्गी लावली. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच जिल्ह्यातील सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांना सोबत घेऊन आमची राजकीय वाटचाल होत आहे, त्यामुळे मी ज्यांना- ज्यांना भेटते त्यांना कधीही जातीच्या चष्म्यातून पाहत नाही. तो संस्कार आमचा नाही. बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे असे भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले.

बीड लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करून आता त्या दुसऱ्या टप्प्यात जनतेशी संवाद साधत आहेत. शहरांसह, तालुका, गाव, वाडी, वस्ती, तांड्यावरील ग्रामस्थांकडून मिळणारा प्रतिसाद अतिशय सकारात्मक असून जिल्ह्यातील जनतेला माझ्याबद्दल असलेले प्रेम आणि आपुलकीची प्रचिती यातून येत असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. ठिकठिकाणी जनतेच्या काही समस्या असतात, त्या समस्या मला भेटल्यानंतर लोक मांडत आहेत, मात्र माझ्या उमेदवारीबाबत ते आनंद व्यक्त करत आमचा आशीर्वाद पाठीशी असल्याची ग्वाही देत असल्याचे सांगून पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या, मी जरी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असले तरी यापूर्वी लोकसभा निवडणुकीचा मोठा अनुभव मला घेता आलेला आहे. मूळात माझी राजकारणाची सुरुवातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून झाली. सन २००९ ला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचाराची धुरा माझ्या खांद्यावर होती, त्यापूर्वी 2004 ला मी मुंडे साहेबांच्या सोबत विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. नंतर 2006 ला बीड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी प्रचारक म्हणून काम केले.नंतर 2009 ला निवडणुकीचा प्रचार केला त्यानंतर 2014 ची लोकसभा निवडणूक मुंडे साहेब असताना मी हाताळली, तेव्हा तर मी एकटीच जिल्ह्यात आमदार म्हणून सोबत होते. विरोधकांची शक्ती आमच्यासमोर असताना आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अतिशय ताकदीने आणि निर्धाराने ती निवडणूक लढलो आणि ऐतिहासिक विजयही मिळवला. मुंडे साहेबानंतर पोटनिवडणुकीलाही आम्ही सामोरे गेलो.गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही निर्धाराने लढलो.डॉ.प्रीतमताई मुंडे या विक्रमी मताने खासदार म्हणून निवडून आल्या. याच काळात मी राज्याची मंत्री म्हणून काम करत होते; त्यापूर्वी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून काम केले त्यामुळे राज्यभर काम करण्याचा अनुभव मला या साऱ्या निवडणुकीच्या कालावधीत मिळाला. आता मी स्वतः बीड लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून सामोरे जाताना जिल्ह्यात प्रचाराला फिरताना अडचण येत नाही; कारण जिल्ह्यातील जनता महायुती सोबत आहे.

जिल्ह्यातील सर्व जनतेची मी जनसेवक आहे सर्वांच्या विकासासाठी माझी उमेदवारी आहे. मी ज्यांना-ज्यांना भेटते त्या मतदारांना मी कधीच जातीच्या अथवा धर्माच्या चष्म्यातून पाहत नाही. लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचे ते संस्कारच नाहीत.आम्ही कायम विकासासाठी समाजकारण आणि राजकारण करत आलेलो आहोत. मुंडे साहेब सर्व जनतेचे नेते होते. त्यांच्या विचाराचे पाईक म्हणून काम करताना बीड जिल्ह्याचा जनतेच्या विकासासाठी आपण काम करत राहू, जिल्ह्याला आणखी विकसित करू अशी ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी उपस्थितांसमोर दिली. बीड जिल्ह्यात मतदारांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आहे. जनता या निवडणुकीत त्यांचे मत रुपी आशीर्वाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी मला भरघोस मतदान करतील हा विश्वास असल्याचेही पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा

बीड जिल्ह्यातील जनतेने लोकनेते मुंडे साहेबांना त्यांच्या राजकीय संघर्षाच्या काळापासून प्रेम दिले आहे. मुंडे साहेबांना कधीही या जनतेने एकटे पडू दिले नाही. आज आम्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी मतदानाचे आवाहन करण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचतो आहोत. मतदार माझे वाडी-वस्ती-तांड्यावर ज्या उत्साहाने स्वागत करत आहेत, त्यातूनच त्यांची आमच्या विषयीची निष्ठा आणि विश्वास दिसून येतो. जिल्ह्यातील जनतेचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे. अशा भावना ठिकठिकाणी होत असलेल्या स्वागतानंतर पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.

वाढत्या उन्हात कार्यकर्त्यांनो स्वतःला जपा

मला उमेदवारी मिळाल्यापासून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत. बुथनिहाय काम करताना हे कार्यकर्ते तहानभूक विसरून अधिकाधिक मतदारांपर्यंत महायुतीचे ध्येयधोरणे पोहोचवताना झोकून देऊन काम करत आहेत. जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्त्यांची आमच्या प्रती असलेली ही आपुलकी लोकनेते मुंडे साहेबांची देन आहे. यंदा उन्हाची दाहकता अधिकच जाणवत आहे. अशावेळी कार्यकर्त्यांनो स्वतःची काळजी घ्या. माझे कार्यकर्ते मला त्यांच्या जीवापेक्षा अधिक जपतात, त्यामुळे त्यांनीही आधी स्वतःची काळजी घेऊन प्रचार करावा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी बीड दौऱ्यात कार्यकर्त्यांना केले.
••••

Exit mobile version