Site icon लोकाशा-बंब न्यूज

अजित पवार नाराज?; सुनील तटकरे आणि धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट


बीड दि. 14 ः सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी कटू शब्दांत फटकारले होते. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांचे समर्थक नेते मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वीय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्यासोबत या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.
या बैठकीनंतर मुंडे आणि तटकरे यांनी अजित पवार नाराज नसल्याचा सूर व्यक्त केला. कुणीही नाराज नाही, प्रत्येकजण आपल्याआपल्या कामात व्यस्त आहेत. कामासंदर्भात पवारांना भेटलो. अजित पवार पुण्यात कोरोनासंदर्भातील बैठकीत व्यस्त आहेत, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. तसेच मुंडे यांनीही अजित पवार होण्याचा प्रश्नच नाही, असे म्हटले. तर या मुद्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, शरद पवारांनी केलेल्या विधानावरुन इतरांच्या जीवाची घालमेल होऊ नये, असा टोला लगावला आहे. दुसर्‍या पक्षाच्या संदर्भात बोलणं नैतिकतेला धरुन नाही. पार्थ पवार नाराज आहेत का हे त्यांचे आजोबा ठरवतील, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे.सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार्‍या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी कटू शब्दांत फटकारल्यानंतर पवार कुटुंबात कलह असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य केले आहे. चि. पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. लोकसभेची त्यांची उंच उडी चुकली आहे. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करुन कसदार बनायची संधी आहे. शरद पवारांचे बोलणे हे आजोबांचा सल्ला म्हणजेच आशीर्वाद यादृष्टीने घेतले तर मनावरचा ताण कमी होईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्याकरिता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करुन घेत नाही ना? अशी शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे.

Exit mobile version