(बीड प्रतिनिधी)
राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत यापुढे कलावंतांना सरसकट एकाच श्रेणी मध्ये ग्राह्य धरून 5000 हजार रुपये दरमहा मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपा महायुती राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पाठपरावा करून कलाकारांना न्याय दिल्या बद्दल आज संघर्ष योद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय बीड येथे वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य तथा बीड जिल्हा मराठी शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास काटे, यांच्या नेतृत्वात वृद्ध कलाकार बांधवांनी राजेंद्र मस्के यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.
याप्रसंगी प्रा. देविदास नागरगोजे, महाराष्ट्र कला सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शैलजाताई मुसळे व शिष्ट मंडळ, वासुदेव संघटना ह.भ.प. हनुमान महाराज शेळके, हभप प्रभाकर महाराज कुटे, संजीवनीताई आतकरे, सरपंच रवींद्र गंगावणे, शांतीनाथ डोरले, धोंडीराम आमटे, युवा शाहीर गईदास उगले, राम वानरे, शिवाजी जगताप, शिद्धेश्वर शिंदे, धोंडीराम काळे, नारायण शिंदे, शिवाजी भगाडे, परमेश्वर करांडे, जगन्नाथ रत्नपारखे, शाहीर तुकाराम ठोंबरे यांच्यासह शेकडो कलावंत उपस्थित होते.
कलावंतांची मागणी लक्षात घेऊन अ. ब. क. अशी श्रेणी न ठेवता सरसकट 2250 हून मानधनात दुपटीने वाढ केल्याने आता कलाकारांना 5000 रु मिळणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील वृध्द कलाकार बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. मानधनात वाढ करावी व घरकुल योजनेत वृद्ध कलाकारांसाठी राखीव कोटा आरक्षित करण्यात यावा या दोन मागण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मागील पंधरवड्यात मंत्री सुधीरभाऊ बीड दौऱ्यावर असताना मानधन वाढीचा निर्णय लवकर होईल सध्या प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मांडलेला आहे असे आश्वासित केले होते. त्याप्रमाणे काल या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
