
बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच वंचितांसाठी लढा दिलेला आहे, त्यामुळे ते लोकनेते झाले, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कर्तृत्वान लेकी पंकजाताई आणि खा. प्रीतमताई मुंडे या काम करीत आहेत. विकासासाठी कसा आणि किती निधी आणायचा हे दोघींनीही खर्या अर्थाने दाखवून दिलेले आहे, त्यामुळेच स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्याप्रमाणेच त्यांचीही जनतेत तुफान क्रेझ आहे. याच कृर्तत्वान आणि विकास कन्या म्हणून ओळखल्या जाणार्या पंकजाताईंचे रविवारी जिल्ह्यातील गावागावात जंगी स्वागत झाल्याचे पहायला मिळाले. मानूर या ठिकाणी ताईंच्या हस्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले, याठिकाणी जमलेली गर्दी पाहूण पंकजाताई भरावून गेल्या, तुमचं हे प्रेम मी जन्मभर विसरू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविले.
रविवारी पंकजाताईंनी शिरूर आणि पाटोदा तालुक्याचा दौरा केला, त्यानुसार खालापुरी, आर्वी, ब्रम्हनाथ येळंब, घाटशीळ पारगाव, मानूर, कारेगाव याठिकाणचा दौरा केला. कोणत्याही मोठ्या पदावर नसताना त्यांना मिळणारी ही लोकप्रियता खरोखरच जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. नेहमीप्रमाणेच रविवारीही त्यांचे गावागावात जंगी स्वागत झाल्याचे पहायला मिळाले, शिरूर तालुक्यातील मानूर येथे उभारण्यात आलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे पंकजाताईंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आ. सुरेश धस, आ. मोनिका रांजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजय गोल्हार, सर्जेराव तांदळे, सलिम जहाँगिर, अशोक पाखरे, अजय बांगर, ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे, संतोष मानूरकर, सुधिर घुमरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, की साहेब आपल्याला सोडून जातील असे कधीच कोणाला वाटले नव्हते, आज साहेब आपल्यासोबत असायला हवे होते, असे सांगत यावेळी पंकजाताईंनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की गोपीनाथ गड मी राजकारणासाठी उभा केलेला नाही, हा गड माझ्या मालकीचाही नाही, या गडाचे मालक खरे तुम्हीच आहात, हा गड वंचितांसाठी एक उर्जास्थान तर युवकांसाठी प्रेरणास्थान आहे, त्यामुळे तुम्ही गोपीनाथ गड गावागावात घेवून जा, परळीत उभा केलेल्या गडावर सर्व पक्षीय नेते आले, दोन्ही छत्रपतीही आले, यातून वंचितांना उर्जा मिळाली आणि याहीपुढे मिळतच राहणार आहे. जीवनात माझ्याकडून कधीच चुकीचे काम होणार नाही, तुमची मान खाली जाईल, असे काम मी कधीच करणार नाही, साहेबांना जावून आज जवळपास दहा वर्ष होत आहे, माझ्याकडे कोणतेही मोठे पद नसताना आज तुम्ही माझ्यासोबत ताकतीने उभे आहात, हे तुमचं प्रेम मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नसल्याचे यावेळी पंकजाताईंनी स्पष्टपणे सांगितले. ताईंचा हाच साधेपणा, आपलेपणा खर्या अर्थाने बीड जिल्ह्याच्या नेहमीच कामाला येणार आहे.
