Site icon लोकाशा-बंब न्यूज

प्रवीणकुमार बांगर यांचा दणका, गेवराई पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून पाच महिलांची केली सुटका

बीड – शहरातील कुंटणखाण्यावर छापा टाकून ८ महिलांची सुटका केल्यानंतर पुढील २४ तासांच्या आत गेवराई पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई केली. गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथील टोलनाक्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्याचा पर्दाफाश करत पाच महिलांची सुटका केली, तसेच एका एजंटासह आंटीला ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास केली. सुंदर ज्ञानोबा भिसे (वय ४०, रा. बीड) व राधाबाई लोखंडे (वय ६०, रा.धारूर), असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून, परजिल्ह्यातील महिलांना बीडमध्ये आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होते.

माहिती मिळताच गेवराईचे पाेलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी बुधवारी सायंकाळी डमी ग्राहक पाठवून याचा पर्दाफाश केला. यावेळी सातारा, इचलकरंजी, अमरावती, पुणे येथील पाच महिलांची सुटका केली. घटनास्थळावरून काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, सहायक निरीक्षक संतोष जंजाळ, संजय राठोड, राजू भिसे, रेणुका बहिरवाळ, संजय सोनवणे आदींनी केली.

Exit mobile version