बीड, दि. 20 (जिमाका) : मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी आज केले.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात तालुका नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी व तहसील कार्यालयाने नियुक्त केलेल्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आज आयोजित केले. हे प्रशिक्षण पुणे येथील गोखले इन्स्टियूट ऑफ इंकानॉमिक्स मधील मास्टर ट्रेनर महारुद्र हाडोळे यांनी प्रशिक्षण दिले.
यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे, सहायक जिल्हाधिकारी कष्मिरा नायर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, बी.बी. बिकड जिल्हा प्रशासन अधिकारी, तहसिलदार नरेंद्र कुलकर्णी, प्रशिक्षक श्री. हाडोळे मंचावर उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाचे काम मंगळवार 23 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीतच पूर्ण करावयाचे आहे. आजचे प्रशिक्षण हे जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आले असून आज या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये कोणालाही काही शंका असल्यास निसंकोचपणे त्यांनी मांडाव्यात जेणेकरुन सर्वेक्षण करतेवेळी नागरिकांचे समाधान होईल. या सर्वेक्षणाचा उपयोग राज्यस्तरावरील निर्णय प्रक्रियेत महत्वाचा वाटा असेल. त्यामुळे जागृकपणे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.
मास्टर ट्रेनर श्री. हाडोळे यांनी मराठा समाज व खुल्या समाजाचे सर्वेक्षण करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या मोबाईल ॲपची सविस्तर माहिती देवून त्यात असणाऱ्या मेनु, उपमेनु मध्ये सर्वेक्षणांतर्गत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उकल केली. उपस्थित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना आलेल्यांनी प्रश्न विचारुन शंकेचे निसरन केले. मंगळवारपासून सर्वेक्षण सुरू होणार आहे. वापरण्यात येणारा मोबाईल ॲप हा सर्वेक्षण करतेवेळीच सुरु होईल. त्यामुळे आज या सर्वेक्षणाची रंगीत तालीम (मॉक रियर्सल) झाली.
वर्ष 2011 च्या जनगनणेनुसार जिल्हयाची लोकसंख्या 25,85,962 होती. सध्या अंदाजित लोकसंख्या ही 28,43, 169 आहे. त्यानुसार जिल्हयातील एकूण कुटुंबांची अंदाजीत संख्या 5,68,634 आहे. जिल्ह्य़ातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण करणेसाठी जिल्हयात एकूण 12 नोडल अधिकारी व एकूण 13 सहायक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका स्तरावर संबंधीत तहसीलदार हे नोडल अधिकारी असतील तर संबंधीत मुख्याधिकारी हे सहायक नोडल अधिकारी असतील. तसेच सर्वेक्षणासाठी तहसील व नगर पालिका/नगर प्रशासन विभाग यांचेकडून कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यानुसार सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांची संख्या ही 4,012 आहे. तसेच पर्यवेक्षकांची संख्या ही 278 आहे. ही माहिती मागासवर्ग आयोगास पाठविण्यात करण्यात आली आहे.