बीड (प्रतिनिधी)
दि.१९ : गत ५ वर्षात बीड मतदारसंघात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून बीड मतदारसंघासाठी तब्बल १० कोटींहून अधिकचा निधी मिळाला आहे. हा निधी राज्य शासनाचे विविध विभाग आणि जिल्हा नियोजन समितीमधून प्राप्त झाला आहे. बीड मतदारसंघासाठी भरीव निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत.
बीड मतदारसंघात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर हे शासन, प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून बीड मतदारसंघातील ग्रामीण भागात ३ कोटी १० लाख आणि शहरी भागासाठी ५ कोटी २० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. इतर योजनेतून २ कोटींहून अधिक निधी दिला आहे. तसेच, यापूर्वीच अल्पसंख्यांक बहुलक्षेत्रासाठी राज्य शासनाकडून ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या सर्व निधीतून ग्रामीण भागातील रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण, महावितरण कंपनीशी संबंधित विद्युत कामे, जलसंधारणाची कामे, बंधारे, शाळांसह वर्गखोल्या, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम आणि दुरुस्त्या, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये विविध सुविधा, तीर्थक्षेत्र विकासाची कामे होणार आहेत. तसेच, शहरी भागातील दलित वस्ती, दलितेत्तर योजना, जिल्हा नगरोत्थान योजनेतून रस्ते, नाली कामांसह विविध प्रकारची विकासकामे होणार आहेत. यासोबतच अल्पसंख्याक बहुलक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विविध विकासकामे होणार आहेत. निधी मंजूर झालेली विकासकामे गतीने पूर्ण करून घेतली जातील, अशी माहिती डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली आहे. तसेच, आणखी मोठ्या प्रमाणावर शासनाकडून निधी मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बीड मतदारसंघासाठी भरीव निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत.
विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्नशील -डॉ.योगेश क्षीरसागर
बीड मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीने नेमका कुठे आणि काय विकास केला? हे दिसून तर येत नाही. गत ५ वर्षांत मतदारसंघात विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. शासनाकडे आणखी अनेक विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. निवडणुकांपुर्वी कोट्यवधींचा निधी येईल, असा विश्वास डॉ. योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.