Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्याची सेवा करताना रेल्वेचा मार्गी लागलेला प्रश्न आणि रस्ते सुधारणा हाच माझ्या जीवनातला खरा आनंद-खा.डॉ.प्रितमताई मुंडे


किल्लेधारूर(प्रतिनिधी)-आपल्या जिल्ह्यात खासदार म्हणुन काम करताना मागच्या नऊ वर्षात केंद्र सरकारच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत घेवुन जाताना दुर्गम भागातील दळणवळण, राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागताना नगर-बीड-परळी रेल्वे जिल्ह्याच्या भुमीत आली हाच खरा माझ्या जीवनातला आनंद असुन धुनकवाडसारख्या दुर्गम भागात मताचं राजकारण न करता केवळ गोरगरिबांच्या हिताला प्राधान्य म्हणुन पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटीपेक्षा जास्त रूपायांचा रस्ता मंजुर केला. ज्याचे भुमिपुजन मी केलं आता धुनकेश्वराच्या आशिर्वादाने लोकार्पणाला देखील येणार असे सांगत कुंडलिका नदीवरच्या पुलाचा प्रश्न मार्गी निश्चित लावणार असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी केले.
पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत धुनकवाड नं.2 ते उपळी रस्ता बांधणीच्या भुमीपुजन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ नेते डॉ.स्वरूपसिंह हजारी होते तर व्यासपीठावर प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी, युवा नेते ऋषिकेश आडसकर, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत हजारी, तालुका अध्यक्ष अ‍ॅड.बालासाहेब चोले, महादेव तोंडे, दत्ता धोत्रे, अ‍ॅड.मोहन भोसले, सरपंच अनिता गव्हाणे, बालासाहेब गायकवाड, शिवाजी मायकर, अर्जुनराव तिडके, दादासाहेब घोळवे, अंगदराव मुंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. गावात आगमन होताच मिरवणुकीने स्वागत झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने खासदारासह उपस्थित मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना पत्रकार जगदिश गोरे यांनी गावातील अनेक विकासकामाचा उल्लेख करून खासदार ताईंनी सोडवण्याची मागणी केली. राम कुलकर्णी यांनी एका साध्या कागदावर रस्ता लिहुन दिल्यानंतर दिल्ली दरबारात पाठपुरावा करून खासदार ताईंनी आमचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन केले. स्व.गोपीनाथराव मुंडेंची आठवण काढत त्यांनी कुंडलिका नदीवर दोन गावाला जोडणार्‍या पुलाचे बांधकाम मंजुर करून देण्याची मागणी केली. युवा नेते ऋषिकेश आडसकर यांनी भविष्यात खासदार ताई केंद्रात मंत्री होणार हे सांगताना विकासाची त्यांना दुरदृष्टी असल्याचे बोलले. डॉ.स्वरूपसिंह हजारी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांसाठी अनेक योजना चालु करून देशात सबका साथ, सबका विकास याच तत्वाचा अवलंब खा.प्रितमताईंनी करताना बीड जिल्ह्यात विकासाची गंगोत्री खेचुन आणल्याचे ते म्हणाले. खा.ताईचं गावात आगमन होताच भुमीपुजन कार्यक्रमात महिला सरपंच अनिता गव्हाणे आणि प्रमुख व्यासपीठावर त्यांना बसवल्यानंतर महिलांचा सन्मान या गावात आदर्श असल्याचे सांगुन जिल्हा परिषद शिक्षकाने वृक्ष लागवड करून सामाजिक दायित्व पार पाडले. गावकर्‍यांचा हा विचार ऐक्य ठेवणारा असुन समाजाला आदर्श देणारा वाटतो. आदर्श ग्राम विकास योजनेत भविष्यात गावचा समावेश करणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. बीड जिल्ह्यात पंकजाताई पालकमंत्री असताना विकासाचा मोठा बॅकलॉग भरून काढला. जिल्हाभरात राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली ज्याच्यावर अकरा हजार कोटी रूपये खर्च झाल्याचे त्यांनी बीड-परळी-नगर रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यात मला यश मिळाले हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद हे सांगताना धुनकवाडसारख्या दुर्गम भागात ज्या गावात येताना मी रस्ता मंजुर करूनच आले पण माय माऊलींनी किती रस्त्यासाठी संकट सहन केले हा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला. विकास करताना आम्ही मताचे राजकारण करत नसुन सामान्य जनतेची गरज काय? यावर जास्त मी भर दिला. भविष्यात पुन्हा हा जिल्हा विकासाच्या प्रगतीकडे घेवुन जाण्यासाठी प्रयत्नशीलच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागवत गव्हाणे, राम यादव, जगदिश गोरे, अभिमान यादव, भागवत भोसले, वचिष्ट कागणे आदीसह समस्त गावकर्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यकारी अभियंता श्री सगर, उपअभियंता फड आणि मे.श्री साई कन्स्ट्रक्शनचे विलासराव थोरात यांची उपस्थिती होती.

Exit mobile version