Site icon लोकाशा-बंब न्यूज

निर्दयी मातेने परळीतील मालेवाडी रोडला आठ महिन्याच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकले ; पो.नि. हेमंत कदम आणि त्यांच्या टीममुळे मुलीचे प्राण वाचले, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू


दिलीप बद्दर
परळी वैजनाथ दि ८ :- परळी तालुक्यातील मालेवाडी रोडवर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर अज्ञात निर्दयी मातेने एका आठ महिन्याच्या मुलीस पोत्यात गुंडाळून फेकल्याची खळबळजनक घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी घटनास्थळ गाठुन मुलीस ताब्यात घेत परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सदर मुलीवर परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांना अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की, मालेवाडी रोड लगत एक मुलगी पोत्यात गुंडाळून फेकलेली आहे कुणी फेकली माहित नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, व पोलीस जमादार सुनील अन्नमवार यांच्यासह घटनास्थळ गाठले आणि पाहतात तर काय एक आठ वर्षीय मुलगी तिचं अर्ध शरीर पोत्यात आणि पाय बाहेर अशा स्थितीत आढळून आली. पोनी हेमंत कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर मुलीस परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणून उपचारार्थ दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुकाराम गुट्टे, ब्रदर मगन वसावे, संजय वरवटकर, सिस्टर गायकवाड आणि मुलीवर ताबडतोब उपचार सुरू केले. पोटात अन्न पाणी नसल्याकारणाने मुलगी फारच अशक्त झाली असल्याची दिसून आली. सध्या उपजिल्हा रुग्णालयात मुलीवर यशस्वी उपचार सुरू असून तिची तब्येत चांगली असल्याचे डॉक्टर आणि सांगितले. ह्या
घटनेने मालेवाडी परिसर आणि तालुक्यात खळबळ माजली असून ती निर्दयी माता कोण याचा तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम करीत आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस जमादार सुनील अन्नमवार यांच्या मुळे सदर मुलीस जीवदान मिळाले आहे.
दरम्यान या घटनेची अद्याप परळी ग्रामीण पोलिसात नोंद झाली नसून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version