Site icon लोकाशा-बंब न्यूज

शरद पवार- पंकजाताई मुंडे लवाद यशस्वी ; ऊसतोड कामगारांच्या मजुरीत ३४ टक्के ऐतिहासिक दरवाढ, ऊसतोड मजूरांत आनंदाचे वातावरण ; ऊसतोड कामगारांची ‘वाघिण’, कामगारांनी दिल्या घोषणा

पुणे ।दिनांक ०४।
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजूरीत ३४ टक्के आणि मुकदमांच्या कमिशनमध्ये एक टक्का एवढी दरवाढ झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या लवादाचे हे यशस्वी फलित आहे. दरम्यान या दरवाढीबद्दल ऊसतोड कामगारांनी आनंद व्यक्त करत ऊसतोड कामगारांची “वाघिण’ अशा घोषणा देत पंकजाताईंचे आभार मानले आहेत.

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पुण्यात आज ज्येष्ठ नेते शरद पवार व पंकजाताई मुंडे यांच्या लवादाची बैठक पार पडली. ऊसतोड कामगार संघटनानी केलेल्या मागण्यांवर बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये यशस्वी चर्चा झाली. बैठकीनंतर पंकजाताई मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ऊसतोड मजुरांना ३४ टक्के तर मुकदमांच्या कमिशनमध्ये एक टक्का एवढी दरवाढ झाल्याची घोषणा पंकजाताईंनी यावेळी बोलतांना केली.

मुंडे साहेबांनंतर दुसरी सर्वात मोठी वाढ ; मजूरांत आनंदाचे वातावरण

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या काळात लवादाने ऊसतोड कामगारांसाठी मोठी दरवाढ केली होती त्यानंतर पंकजाताईंच्या लवादात झालेली ही दुसरी मोठी दरवाढ आहे. या दरवाढीबद्दल ऊसतोड मजूरांनी आनंद व्यक्त केला आहे. पंकजाताईं नेहमीच मजूरांच्या हिताचे निर्णय घेतात, आजचा निर्णय देखील तसाच झाल्याने ऊसतोड कामगारांची ‘वाघिण’ असा जयघोष करत मजूरांनी पंकजाताईंचे आभार मानले.

ऊसतोड महामंडळाकडून काम पूर्णत्वास जावं

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन झाले खरे पण अद्यापपर्यंत या महामंडळाचे काम पूर्णत्वास गेले नाही. महामंडळाकडून कामगारांच्या हिताचं काम व्हावं अशी सर्वांबरोबरच माझी देखील अपेक्षा आहे, यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याने पंकजाताई यावेळी म्हणाल्या. दरम्यान आजच्या दरवाढीबद्दल त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांसह साखर संघाचे आभार मानले आहेत. आजच्या बैठकीत साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, उपाध्यक्ष प्रताप मोहोळ,
प्रकाश सोळंके, जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, आ. सुरेश धस आदींसह ऊसतोड संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
••••

Exit mobile version